-दंडात्मक कारवाईसह वस्तू जप्ती पंचनामा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात गाव संघटना, ग्रामपंचायत समितीने मोहीम हाती घेतली आहे. गावातील विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करीत हजारो रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करीत दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच दंडाची रक्कम न देणाऱ्यांकडून वस्तू जप्ती पंचनामा करण्यात आला.
शंकरपूर येथील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी मुक्तिपथच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन जागृती करण्यात आली. अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी गावात मुक्तिपथ गाव संघटना व ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर गावातील अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला. यासंदर्भातील सूचनाही दारू विक्रेत्यांना देण्यात आल्या. गावात दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याकडून दंडात्मक कारवाई व वस्तू जप्ती पंचनामा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी निर्णयाचे उल्लंघन करीत आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. त्यामुळे ग्रामपंचायत समिती, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने ग्रामसभेच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत विक्रेत्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिसंक कृती करीत पाच दारू विक्रेत्यांकडिल देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. दोन विक्रेत्यांकडून १० हजार रुपये दंडाची रक्कम घेऊन ग्रामपंचायत सामान्य फंडामध्ये जमा करण्यात आली. तर एका विक्रेत्याकडून ७ हजार रुपये किंमतीची वस्तू जप्ती पंचनामा करण्यात आला. या मोहिमेमुळे गावातील दारूविक्रेते धास्तावले आहेत.
गावाला अवैध दारूच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत समिती व गाव संघटनेने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ही मोहीम नियमित सुरु राहणार असल्याने लवकरच गाव दारूविक्रीमुक्त होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. यावेळी सरपंच दादाजी वालदे , तंटामुक्ती अध्यक्ष चंदनवाटबरवे, पोलीस पाटील उषाताई बद्धे, Icrp अवसरे, गावातील बचत गटाच्या महिला , ग्राम पंचायत कर्मचारी गाव संघटनेच्या महिला, ग्रापं समिती व मुक्तिपथच्या तालुका संघटिका भारती उपाध्ये, अर्चना मेकलवार उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)