The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १९ जुलै : तालुका मुख्यालयातून मुरुमगावकडे जात असतांना ढवळी गावाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुमगाव ग्रामपंचायतचे सचिव विनोद बाळकृष्ण आखाडे (४६) हे स्वताच्या एमएच ३३ ए ५९६१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने कर्तव्यावर जात असतांना ढवळी गावाजवळ पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या खाली उतरून झाडाला धडकले. या अपघातात अपघातात ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अपघातात कार क्षतीग्रस्त झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.