-मुक्तिपथ व गाव संघटनेचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : बैलाचा पोळा हा बळीराजाचा मुख्य सण आहे. यानिमित्ताने गावागावात अवैध दारूविक्री होण्याची शक्यता असते. यामुळे गावात सणाच्या दिवशी भांडण-तंटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ढवळ्या-पवळ्याचे उपकार फेडण्यासाठी साजरा केलेल्या बैल पोळ्याच्या दिवशी दारूविक्री होऊ नये, या हेतूने मुक्तिपथतर्फे दरवर्षी दारूमुक्त पोळा हा उपक्रम राबविला जातो. यंदाही जिल्हाभरात मुक्तिपथ व गाव संघटनेच्या वतीने सभेच्या माध्यमातून जागृती करून यंदाचा सण दारूमुक्त करण्याचे आवाहन केले जात आहे.
बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे आभार मानण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या सणाला अनेक गावांत मोठ्या प्रमाणात दारू गाळून प्राशन केली जाते. अनेक दिवसांपासून गावात बंद असलेली दारू पोळ्याच्या निमित्ताने सुरु होण्याची शक्यता असते. दारू सुरु झाली की पुन्हा गावातले वातावरण बिघडते. या दिवशी दारू पिऊन अनेक जण सणाचे पावित्र्य व गावातील शांतता भंग करतात. गावात तंटे निर्माण होतात. दरवर्षी दारूमुक्त पोळा ही संकल्पना मुक्तिपथ अभियानाद्वारे राबविली जात आहे. आतापर्यंत जिल्हावासियांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यंदाही दारूमुक्त पोळा साजरा करण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरातील गावांमध्ये मुक्तिपथ तर्फे जनजागृती करून दारूमुक्त पोळ्याची महत्व पटवून दिले जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )