कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सण उत्सव साजरे करा

75

– नवनियुक्त उपविभागीय अधिकारी रंजीत यादव यांचे प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २६ : भारत हा देश उत्सव प्रिय देश असून या देशात सर्व धर्मातील अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण उत्सव साजरे करताना प्रत्येक नागरिकाने माणुसकीच्या धर्माने सर्व धर्मामध्ये प्रेमभाव रुजवून व प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण उत्सव साजरे करा असे प्रतिपादन नवनियुक्त उपविभागीय अधिकारी रंजीत यादव यांनी केले. ते आज कुरखेडा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पोलीस विभागाच्या वतीने आयोजित शांतता बैठकी कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रमेश कुंभरे, कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ, गट विकास अधिकारी धीरज पाटील, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, वीज वितरण केंद्र कुरखेडा चे उपकार्यकारी अभियंता मिथुन मुरकुटे, वैद्यकीय अधीक्षक अमित ठमके, तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना रंजीत यादव म्हणाले की,आपली परंपरा सर्वधर्म समभावाची असून त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण असावे, सोशल मीडियावर अफवा पसरू नये याबाबत योग्य नियोजन करावे. परीक्षा कालावधी असल्याने ध्वनीवर्धकाचा आवाज कमी ठेवावा. सोशल मीडियावर सामाजिक सलोखा बिघडविनाऱ्यावर व धार्मिक भावना भडकविणाऱ्या पोस्ट वर कारवाई करावी, मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, मद्यप्राशन किंवा धिंगाणा करणाऱ्यावर कारवाई करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, गटविकास अधिकारी धीरज पाटील, वैद्यकीय अधीक्षक अमित ठुमके, कृषी अधिकारी संजय रामटेके, विद्युत अभियंता मिथुन मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आव्हाड, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, पोलीस पाटील नंदेश्वर यांनी शांतता बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले तालुक्यातून आलेले शेकडो शारदा दुर्गा उत्सव मंडळातील पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक यांना मार्गदर्शन केले.
शांतता बैठकीचे प्रास्ताविक भाषणात ठाणेदार महेंद्र वाघ म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी. समाजात विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख पोलीस विभागाला करून द्यावी. दुर्गा व शारदा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी उत्सवाच्या काळात सहकार्य करावे, सर्व नागरिकांनी शांतता एकोपा आणि सामंजस्य राखून उत्सव शांततेत पार पाळावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र सोनकुकरा यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोबें यांनी मानले.
शांतता बैठकी सभेत कुरखेडा तालुक्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार बंधू, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, दुर्गा व शारदा मंडळाचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व महीला भगनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुरखेडा पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here