मोडेभट्टीत दारूबंदीचा विजय महोत्सव साजरा

51

– ग्रामस्थांनी व्यक्त केले दारूबंदीचे महत्व
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : धानोरा तालुक्यातील मोडेभट्टी गावातील ग्रामस्थांनी १९९५ पासून अवैध दारूबंदी कायम ठेवत एक इतिहास रचला आहे. नुकतेच मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेत दारूमुक्तीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी दारूबंदीचे महत्व विषद करीत इतरही गावांनी एकीतून आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचे आवाहन केले.
दुर्गम भागात वसलेल्या मोडेभट्टी गावात ई.स १९९५ पासून दारूबंदी आहे. गावात व्यसनाचे प्रमाण कमी असून ग्रामस्थ आनंदमय वातावरणात जीवन जगत आहेत. पूर्वीपासून टिकून असलेल्या या दारूबंदीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी मुक्तिपथ व शक्तिपथ संघटना, गावातील प्रतिष्टीत नागरिक विशेष खबरदारी देखील घेत आहेत. या यशस्वी वाटचालीची इतरांना माहिती व्हावी, यासाठी दारूबंदीचा विजयस्तंभ उभारण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. नुकतेच दिनांक 17 जानेवारीला गावात मुक्तिपथच्या मार्गदर्शनखाली दारूबंदीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. एकदिवशीय कार्यक्रमादरम्यान गावातील नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गाव स्वच्छ केले. त्यानंतर गावातील प्रमुख नागरिकांचे स्वागत आदिवासी रेला नृत्याने करीत विजयस्तंभ उभारण्यात आले. आनंदाचे वातावरण निर्मिती करिता महिला, पुरुष, युवक, युवती यांचे कबड्डी खेळ, मेरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. सामूहिक भोजनानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यातून दारूमुळे होणारे नुकसान यावर नक्कल, नृत्य स्पर्धा गावातील युवकांनी सादर केले. विविध खेळात यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
दरम्यान, ग्रामस्थांनी सांगितले की, गावात दारूबंदी आहे तेव्हापासून विविध उपक्रम अतिशय शांत रीतीने पार पाडले जातात. दारूबंदीमुळे गावातील तंटे कमी झाली, मुल चांगले शिक्षण घेत आहेत. दारूमुक्तीमुळे गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे इतरही गावांनी प्रेरणा घेऊन आपल्या गावातून अवैध दारूला हद्दपार करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले. गावातील संपूर्ण कुटुंब मिळून हा विजयोस्तव श्रमदानाच्या माध्यमातून पार पाडण्यात आला. यावेळी पोलिस पाटील अमर हलामी, गावपाटील माणिक हलामी , मन्साराम उईके, धनराम तुलावी, पांडुरंग हलामी, रामजी हलामी, राकेश नैताम, लक्ष्मण बोगा, लक्ष्मण हलामी, गाव संघटना अध्यक्ष लताताई तुलावी, आरोग्य केंद्र मोडेभट्टीचे उंदीरवाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकर, तालूका प्रेरक बुधाताई पोरटे, मुक्तीपथ कार्यकर्ती शितल गुरनुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here