The गडविश्व
चंद्रपूर, दि. २० : बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर लोहारा जंगल परिसरात नर अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. मागील तीन दिवसात ४ अस्वलांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. त्यामुळे आता सदर मार्ग हा वन्यप्राण्यांना धोक्याचे ठरत असल्याचे दिसत आहे.
बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे आणि वाघांचा भ्रमण मार्ग सुद्धा आहे. गोंदिया कडून बल्लारशाह कडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत या नर अस्वलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रेल्वे विभागाकडून वनविभागाला देण्यात आली असता रेल्वेचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान रुळावर अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने गोंदियाकडे जाणारी मालगाडी जवळपास २ तास थांबून होती. वनविभाग व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मृत अस्वलीला रेल्वे रुळावरून बाजूला केल्यानंतर ती मालगाडी पुढे निघाली.
“डेथ ट्रॅप” म्हणून ओळख झालेल्या ह्या रेल्वे रुळावर अनेक वन्यजीवांना जीव गमवावा लागत आहे परंतु उपाय योजना शून्य असून असे किती दिवस फक्त आकडे मोजायचे ? चंद्रपूर जिल्ह्याचे वनवैभव असे नष्ट होत राहिले तर हाती काय उरणार ? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाकडून आणि वनविभागकडून लवकरात लवकर उपाय योजना कराव्या लागतील तरच हे वन्यजीव जंगलात सुरक्षित राहतील.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी तर्फे जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर उपशमन योजना मार्गी लागण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी तर्फे बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर नेहमी वन्यजीव संदर्भात लक्ष ठेवण्यात येते. वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी चंद्रपूर वनविभागातर्फे एक समिती नेमण्यात आली, रेल्वे प्रशासनाला सूचना सुचविण्यात आल्या पण अजूनही कुठलीही उपाय योजना वन्यजीवांसाठी केली नसल्याने अपघाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेची गती संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ५०-६० प्रति किलोमीटर ठेवण्याचे सुचविण्यात आले असल्याचे समजते.
बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे आणि वाघांचा भ्रमण मार्ग सुद्धा आहे. नव्याने घोषित झालेल्या कन्हाळगाव अभयारण्य, कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्यच्या भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो. हाच रेल्वे मार्ग पुढे बालाघाट- नैनपूर मध्य प्रदेश, मधून जातो परंतु तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून अंडर पासेस, ओव्हर पासेस बांधण्यात आलेले आहे. मग महाराष्ट्रात रेल्वे प्रशासन कडून वन्यजीवांसाठी उपाय योजना का करण्यात आलेल्या नाही आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.
अस्वलीचे शव-विच्छेदन डॉ.कुंदन पोदसेलवार यांनी केले. शव-विच्छेदन करतांना घटना स्थळी जुनोना वनविकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्रा, वनरक्षक कांबळे, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे, अंकित बाकडे, वनविकास महामंडळाचे वनमजूर उपस्थित होते.
(#thegadvishva #gadchirolinews #chandrapurnews #junona #tadobaforest )