मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांसोबत दीपोत्सव साजरा

104

– विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबर रोजी अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या या जवानांचे मनोबल उंचावतांनाच त्यांनी आदिवासी बांधवांसोबत भावस्पर्शी एकरूपता साधली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील पिपली बुर्गीला भेट दिली. या भेटीदरम्यान एटापल्ली उपविभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या पिपली बुर्गी पोलीस ठाण्यांतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन विविध वास्तुचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पिपली चुनीं येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकिय इमारतीचे भूमीपूजन, पोलीस अंमलदार बॅरेक आणि अधिकारी विश्राम गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. तसेच पिपली बुर्गी येथे महा जनजागरण मेळाव्यास उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलातील जवान व आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. जवान आणि नागरिकांसोबत फराळ केला. भाऊबीजेच्या निमित्ताने येथील महिला पोलीस अंमलदार व स्थानिक महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे भावस्पर्शी औक्षण केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महा जनजागरण मेळाव्यात उपस्थित असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक भेट वस्तू व साहित्याचे वाटप झाले. तसेच विद्यार्थ्यांना सायकल, शालेय व क्रीडा साहित्य देण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या मागील कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत अभिनंदन केले. या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील पोलीस जवान अतिशय निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असून त्यांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, येथील विशेष अभियान पथकाची टीम ही अतिशय सक्षम असून तिच्या कर्तृत्वाची उच्च स्तरावर दखल घेण्यात येत असते. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाकडून पोलीस दादा लोरा खिडकीसारखे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास होण्यास मदत होत आहे. गडचिरोलीचा विकास हा सरकारचा ध्यास असून, नवीन उद्योग आता या जिल्ह्यात येत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. शालेय विद्याथ्यांनी शासनाच्या मदतीचा लाभ घेऊन आपला विकास साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल , सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, केंद्रीय राखीव बटालियचे समादेशक परविंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
या भावस्पर्शी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक शिवराज लोखंडे यांनी तर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here