– संतप्त जनतेचा पोलीस ठाण्याला घेराव, टायर पेटवून निषेध
The गडविश्व
ता. प्र / चिमूर, दि. १५ : चिमूर शहराच्या एका वस्तीतील दोन निष्पाप अल्पवयीन मुलींवर खाऊचं आमिष दाखवून सातत्याने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण चिमूर शहराला हादरवून टाकलं आहे. रशीद रुस्तम शेख (नडेवाला) आणि नसीर वजीर शेख (गोलेवाला) या दोघा विकृतांनी घरात बोलावून पीडित मुलींवर सप्टेंबरपासून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. या क्रूर कृत्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा समोर येताच चिमूर शहरात प्रचंड संतापाचा भडका उडाला.
पीडित मुली मजूर पालकांच्या कन्या असून, दोघीही शेजारी राहतात आणि मैत्रिणी आहेत. आरोपी रशीदने आधी एकीला खाऊचं आमिष दाखवून घरी बोलावलं आणि अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी नसीरनेही दुसऱ्या मुलीवर तसंच पाशवी कृत्य केलं. या नराधमांचा हैदोस तब्बल दोन महिन्यांपासून सुरू होता असे कळते. शेवटी आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री दोन्ही आरोपींना अटक केली.
दरम्यान या अमानुष घटनेने जनतेचा संताप उसळला. शेकडो नागरिक मध्यरात्री पोलीस ठाण्यासमोर जमले. “अत्याचाऱ्यांना फाशी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या समोर टायर पेटवत तीव्र निषेध केला. पोलिसांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीच नव्हते.
रात्री दीडच्या सुमारास जमाव बेकाबू होताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. याचवेळी जमावातील काही व्यक्तींनी पोलीस ठाण्यावर दगडफेकही केली, त्यामुळे वातावरण अधिकच तापलं.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी रात्रीच चिमूर गाठत अतिरिक्त पोलीस फोर्ससह परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरात पोलीस बंदोबस्त असून, तणावाखाली शांतता आहे.
