अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाच्या पिल्लाचा मृत्यू

134

The गडविश्व
चंद्रपूर, दि. ३० : येथील बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळाच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली .
आज सकाळच्या सुमारास पक्षी निरीक्षक विवेक वाघमारे हे जैविविधतेने नटलेल्या जुनोनाच्या जंगलात पक्षी निरीक्षणासाठी जात असतांना त्यांना बाबुपेठ-जुनोना च्या जंगलात, रस्त्यावर एक चितळाचा पिल्लू मृतावस्थेत आढळून आला. लगेच त्यांनी हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दिनेश खाटे व सुरज देवगडे यांना घटनेची माहिती दिली. बाबुपेठ-जुनोना रस्ता हा संपूर्ण जंगल क्षेत्रातून जातो, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती यांना हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दिनेश खाटे यांनी जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावर नियमानुसार गतिरोधक बनविण्यासाठी वारंवार विनंती केली पण
सार्वजनिक विभाग, रस्ता सुरक्षा समिती यांनी कुठलीही कारवाई केली नाही. परिणामी वन्यजीवांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. रस्त्याचे रुंदीकरणाला सुद्धा हॅबीटॅट कन्झर्वेशन सोसायटी ने विरोध केला होता पण तात्पुरता वेळेवर स्थगिती देऊन कालांतराने रुंदीकरण करण्यात आले. हा रस्ता बाबुपेठ-जुनोना-बल्लारशाह, जुनोना-चिचपल्ली व पोंभुर्णा हा संपूर्ण ४२ किलोमीटर व बाबुपेठ-चिचपल्ली २६ किलोमीटर चा रस्ता संपूर्ण जंगलातून जातो व नेहमी वन्यप्राण्याचा वावर असल्याने गती रोधकांची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली होती.
ह्या एका महिन्यात दोन चितळ व एका सांबराचा मृत्यू बाबुपेठ-जुनोना रस्त्यावरती झाला आहे. काही वर्षांपूर्वी जुनोना पासून काही अंतरावर एका वाघाचा सुद्धा अपघाती मृत्यूची नोंद आहे आणि एका अस्वलाची सुद्धा. इतके अपघात होत असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती गती-रोधक देण्यास का धजावत आहे माहिती नाही परंतु ह्या रस्त्यावर रेती चे ट्रक रात्री खूप वेगाने धावतात, ह्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक ने अस्वलाचा जीव घेतला होता, पण हि वाहतूक रात्रच का होते हे मात्र कळायला मार्ग नाही. आणखी किती वन्यजीवांचा बळी गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती जागी होणार आहे कुणास ठाऊक. ताडोबाच्या बफर क्षेत्रात पदमापूर ते मोहर्ली गतिरोधक चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे मग तिथले वन्यप्राणी महत्वाचे आणि जुनोना जंगलातील वन्यप्राणी मागासलेले असा दुजाभाव का ? सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पदमापूर ते मोहर्ली गतिरोधक बांधा म्हणून कोणत्या गावकऱ्यांची किंवा वनविभाग, वन्यजीव संस्थेची मागणी होती केली होती काय ? तर याच उत्तर अजून पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सापडलेले नाही. बाबुपेठ-जुनोना-पोंभूर्णा रस्त्यावर गतीरोधक बनवावे व अवैध वाहतुकीला आळा घालावा, सूचना फलक सुद्धा लावावे ह्याचा थोडा फार फायदा होईल अशी मागणी हॅबीटॅट कन्झर्वेशन सोसायटी तर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती ला करण्यात आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे जूनोण्याचे जंगल सुद्धा जैवविविधतेने संपूर्ण आहे. ह्या जंगलाकडे सुद्धा लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे असे हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दिनेश खाटे यांनी वनविभागास मत व्यक्त केले.
वनविकास महामंडळ चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए .न मेश्राम व क्षेत्र सहाय्यक डी.जी कांबळे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून चितळ ताब्यात घेऊन जुनोना येथे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडसेलवार यांनी केले. वनरक्षक आर.डी पायपरे, वनमजूर देठे घटनास्थळी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chandrpur #junona #forest #moharli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here