The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०४ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साक्षरता अत्यंत आवश्यक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर गोठणगाव येथील कुथे पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे यासाठी टीसी टीलॅबची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांच्या पुढाकाराने व जिल्हा प्रकल्प समन्वयक (ITC) अविनाश श्याम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत ‘की त्री प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई’ या कंपनीकडून शाळेला संगणक साहित्य प्राप्त झाले आहे. संगणक शिक्षिका म्हणून पौर्णिमा पैसा यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक शिक्षण देत आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून इतर विषयांचे ऑनलाईन शिक्षण देखील विद्यार्थ्यांना मिळत आहे.
मुख्याध्यापक के. जे. बगमारे यांनी सांगितले की, “शहरातील महागड्या शाळांमध्ये उपलब्ध असलेले सुसज्ज संगणक प्रयोगशाळेचे अनुभव आता ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळू लागले आहेत. संगणक प्रशिक्षणामुळे त्यांच्या भविष्यातील संधी निश्चितच वाढतील.”
विद्यार्थ्यांनी संगणकाशी मैत्री करू लागली असून, पालकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे. गाव पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होणे हीच या उपक्रमाची खरी यशोगाथा ठरत आहे.
