– पत्रकारांना विद्यापीठाकडून निमंत्रणच नाही
The गडविश्व
गडचिरोली, ५ जुलै : गडचिरोली येथे बुधवार ५ जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ महामहीम राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत झाला. मात्र या पदवीदान समारंभात समन्वय आणि नियोजनातील उणिवांमुळे विद्यार्थ्यांत गोंधळ उडाला तर ही बाब लक्षात येताच विद्यापीठाकडून सावरासावरही करण्यात आले. तर विद्यापीठाकडून पत्रकारांना या समारंभाचे निमंत्रणही देण्यात आले नव्हते.
कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ ६ विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल असे कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तर राष्ट्रपती निघून गेल्यावर उर्वरित विद्यार्थ्यांना कुलगुरू व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल असे सर्वांना वाटत होते मात्र तसे काहीच न करता व कोणतीही सूचना न देता कार्यक्रम समाप्त झाल्याची घोषणा करून राष्ट्रपतींसह सर्वजण निघून गेले. यानंतर विद्यार्थ्यांत गोंधळ उडाल्याने रुसवे फुगवे असतांना विद्यापीठाच्या वतीने सावरासावर करीत कुलगुरू व प्र कुलगुरू यांच्या हस्ते पदवी वाटपाचा कार्यक्रम उरकण्यात आला. तर ज्या सहा विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र द्यायचे होते त्यापैकी एकाला पुन्हा बोलावण्यात आल्याने सहाव्या विद्यार्थ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या सन्मानाच्या संधीपासून वंचित राहावे लागले असेही कळते.
या कार्यक्रमात सर्वच गोल्ड मेडलधारक आणि पीएचडीपदवी मिळविणाऱ्या सर्वांना निमंत्रित केले होते त्यामुळे मुंबई, बंगलोर, गुजरात येथून ५३ सुवर्णपदक विजेते आणि ५० पेक्षा जास्त पीचएचडीधारक विद्यार्थी कार्यक्रमासाठी आले होते. मात्र उडालेला गोंधळ आणि विद्यापीठाच्या सावरासावरने या सर्व प्रकाराचा सिनेट सदस्य प्रा.डॅा.दिलीप चौधरी, प्रा.निलेश बेलखेडे, दीपक धोपटे, प्रा.प्रवीण जोगी आणि माजी सिनेट सदस्य प्रा.डॉ.प्रमोद शंभरकर यांनी निषेध व्यक्त करत राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोनशिलेचा रिमोटने उदघाटन हा देखावा
दरम्यान या कार्यक्रमात विद्यापीठाच्या अडपल्ली येथील कोनशिलेचे अनावरण रिमोटच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात तसे न होता आधीच कोनशिलेवरचा पडदा हटवितानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हिडीओ राष्ट्रपतींच्या हस्ते प्ले करून देखावा करण्यात आला. तर प्रत्यक्षात रिमोटने कोनशिलेवरील पडदा हटविल्याचे भासविण्यासठी अडपल्ली येथील कोनशिला असलेल्या ठिकाणी पोलिसांचा पहारा लावण्यात आला होता त्यामुळे विद्यापीठाचा हा देखावाही पुढे आला आहे.
कार्यक्रमाचे पत्रकारांना निमंत्रणच नाही
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रत्येक कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका विद्यापीठाकडून देण्यात येते मात्र या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाची पत्रिका पत्रकारांना देण्यात आली नाही. विशेष म्हणजे ३ तारखेला कार्यक्रम संबंधी पत्रकार परिषद घेण्यात आली तेव्हा निमंत्रण पत्रिका मिळेल अशी आशा होती मात्र ती देण्यात आली नाही. देशभरात डिजिटल इंडिया चा कांगावा केला जातो, विविध तंत्रज्ञानाचा वापर वाढून लागल्याने अनेक व्यवहार डिजिटल झाले आहे, योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठीही डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केले जाते तर राज्य सरकारने डिजिटल प्रसार मध्यमांना प्रिंट आणि इलेक्ट्रिक माध्यमांसोबत लाभ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मात्र यात कार्यक्रमात डिजिटल मिडीयाला संबंधित यंत्रणेकडून प्रवेश पास नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gondwana university)