– आठवडाभरात निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या सिंचनाची आणि पाळीव प्राण्यांच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत तात्काळ पाणी सोडावे, या मागणीसह स्थानिक समस्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वैनगंगा नदी पात्रात आज ५ एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
आंदोलनात काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान आणि आमदार रामदास मसराम यांनीही हजेरी लावून आंदोलनकर्त्यांचे मार्गदर्शन केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत लवकरात लवकर नदीत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जर आठवड्याच्या आत गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आले नाही, तर काँग्रेस पक्ष थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन छेडेल, असा इशारा दिला.
या आंदोलनादरम्यान इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन न घेता इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा, भेंडाळा परिसरातील MIDC प्रकल्पासाठी शेतकऱ्यांशी चर्चा न करता होत असलेले जमीन अधिग्रहण तात्काळ थांबवावे, कोटगल बॅरेज प्रकल्पात शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेला मोबदला तातडीने द्यावा आणि बुडीत क्षेत्रातील जमिनीस अतिरिक्त मोबदला मिळावा, मनरेगामधील थकीत मजुरी त्वरित अदा करावी, तसेच वडसा–गडचिरोली ब्रॉडगेज प्रकल्पासाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनीचे मोबदले नव्या दरानुसार द्यावेत, अशा मागण्या यामध्ये समाविष्ट होत्या.
या आंदोलनात युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #WaingangaWaterCrisis #GosikhurdDam #CongressProtest #WaterForFarmers
#GadchiroliNews #ChandrapurUpdates #RightToWater #SaveWainganga #FarmersRights #MaharashtraPolitics