The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०१ : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कुरखेडा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची शक्यता वाढली आहे. अपरिचित फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स आणि अनोळखी नंबरवरून येणाऱ्या विनंत्यांविषयी सावध राहणे आवश्यक आहे. तसेच, मोबाईलच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून बोलणे, समोरच्याला आधी बोलू देणे यासारख्या सुरक्षिततेच्या उपाययोजना स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सध्या फेक न्यूज आणि फोटो मॉर्फिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्याही माहितीवर तात्काळ विश्वास ठेवण्याऐवजी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी देऊ नये यावरही भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षा जागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्राध्यापक मनोज सराटे यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार, कुरखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि गडचिरोली सायबर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी तसेच विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
