धानोऱ्यातील विद्यानगरला पाण्यासाठी रोजची झुंज ; नगरपंचायत असूनही नागरिकांना नाही मूलभूत सुविधा

126

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २३ : धानोरा नगरपंचायत झाल्याला एक दशक उलटलं, पण विद्यानगर परिसरात आजही भीषण पाण्याची टंचाई आहे. नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे मागणी करत असले तरी यंत्रणेकडून केवळ आश्वासनच मिळत आहेत. उन्हाळा तीव्र होत चालला असताना येथील विहिरी कोरड्या पडल्या असून, नळयोजनाही बंद अवस्थेत आहेत.
2015 साली ग्रामपंचायतीचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं, पण सुविधा मिळण्याऐवजी केवळ कराचा बोजा वाढला. “आम्हाला काही नको, फक्त शुद्ध पाणी द्या,” अशी हताश मागणी विद्यानगरच्या रहिवाशांनी पुन्हा एकदा केली आहे.
स्थानिक अंगणवाडी क्रमांक 5 जवळील सौरऊर्जेवर चालणारी नळ योजना बंद आहे, टँकरचीही सोय नाही. घरगुती विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या असून नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळ योजनेला मंजुरी मिळाल्याची घोषणा 2021 मध्ये पहिल्या मुख्याधिकाऱ्यांनी केली होती, मात्र प्रत्यक्षात पाण्याची टाकी अद्याप बांधली गेलेली नाही.
लेडीज होस्टेलजवळ उभारायची होती ती पाण्याची टाकी आजही केवळ ‘दिवा स्वप्न’ ठरली आहे. 2050 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन 0.445 दशलक्ष घनमीटर पाण्याच्या हक्काची मंजुरी मिळाली, पण त्याचे काय झाले? कुठे अडथळा? कोण जबाबदार?
नागरिकांनी आता थेट स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारायला सुरुवात केली आहे. “नगरपंचायत असूनही जर मूलभूत गरजांपैकी एक – पिण्याचे पाणी – उपलब्ध नसेल, तर ही व्यवस्था अपयशी ठरल्याचे स्पष्ट लक्षण आहे,” असा संताप विद्यानगरमधून व्यक्त होत आहे.
विद्यमान यंत्रणांनी तत्काळ लक्ष घालून पाण्याच्या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, हीच सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanora

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here