The गडविश्व
गडचिरोली / आरमोरी, ११ ऑगस्ट : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतांना पुढील कारवाई न होण्याकरिता ५ हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केल्याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रकाश जाधव (३९) विरुद्ध नोकरी करीत असलेल्या आरमोरी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार विरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात कलम २७९/३३७ भांदवि अन्वये अपघाताचा गुन्हा दाखल आहे. तर पुढील कारवाईत मोटार सायकल जप्त न करणे, अटक करून जेलमध्ये न पाठविणे व तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक प्रकाश हनुमंत जाधव यांनी तक्रारदारास ५ हजार रुपयांची मागणी केली मात्र तक्रारदारास लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाप्रवी येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने आज शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी लाप्रवी पथकाने सापळा रचला असता
पंचासमक्ष ५ हजारांची सुस्पष्ट मागणी केल्याप्रकरणी पोलीस नाईकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध १९८८ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सदर कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली असून ज्या पोलीस ठाण्यात पोलीस नाईक नोकरीवर होता त्याचा ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याचा प्रसंग ओढवला आहे.
सदर कारवाई, पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पो.नि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजू पदमगिरीवार, किशोर जौजारकर, पोशि किशोर ठाकूर, संदिप उडाण, संदिप घोरमोडे, मपोशी विद्या म्हशाखेत्री, चापोना प्रफुल डोर्लीकर यांनी केली.