– १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : जिल्ह्यातील देसाईगंज येथून जुनी वडसा या मार्गाने अवैधरित्या गोवंशाची तस्करी होणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांनी सापळा कारवाई करत १२ गोवंशाची सुटका करीत २ चारचाकी वाहन, गोवंशासह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमालजप्त केल्याची कारवाई २८ जानेवारी मध्यरात्री केली. याप्रकरणी सचिन मधुकर बावनथळे, (वय 25), रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली (बैल मालक), प्रणय राजेंद्र बुल्ले, (वय 21) रा. देऊळगाव, ता. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर, राजेश सोमेश्वर बावनकर, (वय 24 ) ल रा. वेळवा, ता. पवणी, जि. भंडारा यांच्यावर पोलीस स्टेशन, देसाईगंज येथे अप. क्र. 033/2025 कलम 5 (अ),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1976, सहकलम 11 (ड) (ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा 1960, सहकलम 3 (5) भान्यासं, सहकलम 119 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान २८ जानेवारी रात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन देसाईगंज ते जुनी वडसा रोडने जाणार आहेत अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देसाईगंजचे पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने जुनी वडसा रोड वरील पोपटे लॉनजवळ सापळा रचुन पाळत ठेवली असता, देसाईगंज ते जुनी वडसा रोडवर दोन वाहने संशयीतरित्या येतांना दिसुन आले. त्यावेळेस सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवुन सदर वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. गोवंशाची सुटका करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप यांचे नेतृत्वात सफौ. विनोद बोगा, पोहवा राजु उराडे व पोअं अजय दुर्गम यांनी केलेली आहे.