– कार्यशाळेत बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार , बाल तस्करी निर्मूलनावर चर्चा
ता.प्र / धानोरा, २५ जुलै : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा अंतर्गत येणाऱ्या आशांकरिता कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व स्पर्श गडचिरोली संचालित एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन प्रकल्पांतर्गत बाल संरक्षण संबंधित बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, बाल तस्करी यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, बाल तस्करी करणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. तरीसुद्धा आज समाजामध्ये असे गुन्हे घडताना दिसून येतात व काही गुन्हे उघड न झाल्याने पीडित बालकाच्या भविष्यावर परिणाम होत आहे. त्याकरिता ग्राम बाल संरक्षण समिती चे बळकटीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे मत लुकेश सोमनकर समन्वयक स्पर्श गडचिरोली यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षपदी प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा चे वैद्यकीय अधिकारी जांभूळे हे होते. त्यांनी बाल संरक्षण यामध्ये आशांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच प्रमुख मार्गदर्शक सायली मेश्राम क्षेत्रअधिकारी यांनी बाललैंगिक अत्याचार व बाल तस्करीचे कारणे व उपाय यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन लीना बाळेकरमकर व आभार महेश रहांगडाले यांनी मानले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वैभव के.सोनटक्के यांनी सहकार्य केले.