– तालुक्यात मंडई व कोंबडा बाजारांत सुरू आहे विषारी ताडीची सर्रास विक्री
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०८ : तालुक्यात मंडई व कोंबडा बाजाराच्या दिवशी गावागावांत विकली जाणारी ताडी आता नागरिकांच्या जीवाशी खेळणारी बनली आहे. ताजी ताडी म्हणून विकली जाणारी ही ताडी खरी ताजी नसून, तिच्यामध्ये केमिकल पावडर व इतर घातक मिश्रणांचा वापर केल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे.
गावोगावी भरणाऱ्या मंडई व बाजारांमध्ये ही पावडर मिसळलेली ताडी सर्रास विक्रीस ठेवली जाते. “ताजी आहे, गोड आहे, पोट साफ होते, स्टोन निघतात” अशा भ्रामक गोष्टी सांगत नागरिकांना आकर्षित केलं जातं. परंतु खरी ताजी ताडी झाडावरून काढली जाते, तिचा रंग, चव आणि गुणधर्म स्पष्ट असतो. मात्र, अनेक ठिकाणी ताजी ताडीच्या नावाखाली विषारी पावडर मिसळून बनवलेली बनावट ताडी विकली जात असल्याने नागरिकांची फसवणूक होतोय आणि त्यांच्या आरोग्याशी थट्टा केली जात आहे. या बनावट ताडीमुळे नागरिकांना अपचन, अॅसिडिटी, उलट्या, डोकेदुखी यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचीही तक्रार आहे. तज्ज्ञांच्या मते ही केमिकलयुक्त ताडी यकृत व मूत्रपिंडासाठी अत्यंत घातक आहे.
तालुक्यात अनेक गावांमध्ये हा गोरखधंदा बिनधास्त सुरू असून, स्थानिक प्रशासन मात्र या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशा ताडी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकाराला आळा घालावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा उद्या उशीर होईल, आणि ताडी ऐवजी विष प्याल्याची जाणीवही होणार नाही.
