– मुरूमगाव, गोडवाही, मोहली, पेंढरी गावाचा समावेश
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी गाव स्तरावर पाण्याची सुरक्षितता वृद्धिगत करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे यांची अमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गावस्तरावर एफ.टी.के किटचे वाटप करण्यात आले. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील १६ गावातील पाणीपुरवठा कामाची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. त्यात धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी, मोहली व गोडवाही या गावांचा समावेश आहे .
हि समिती धानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या या गावातील पाणी गुणवत्ता कामकाजाची तपासणी करणार आहे. एफ.टी. के किटद्वारे पाणी नमुने तपासणी करता गाव पातळीवर पाच महिलांची निवड करण्यात आली आहे. गावातील जल सुरक्षकांच्या सहकार्यातून उपलब्ध स्वतःची रासायनिक जैविक नमुने तपासणी नियमितपणे केली जाते की नाही यासाठी या पाच महिलांना व जलसुरक्षकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षित सुद्धा करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. गावाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवून योग्य ती कारवाई करणे तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले कर्तव्य पार पाडून प्रत्येक घरात शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल या अनुषंगाने नियमित योग्य ती कार्यवाही करावी. पाण्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलासह नागरिकांना साथीच्या विविध रोंगांचा सामना करावा लागू नये व त्याचे आरोग्य निरोगी रहावे या हेतूने राज्यस्तरीय समितीकडून जिल्ह्यातील १६ गावातील पाणी गुणवत्ता कामाची तपासणी करणार आहे. याच करिता जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागल्याचे पहायला मिळते.