The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २४ ऑगस्ट : ढाणकी व आजुबाजुचा ग्रामीण भाग आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिला नसून, येथील नागरिक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवितांना दिसत आहे. ढाणकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेट येथील, ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण या तरुणाचा बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून, पुणे येथील महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३ च्या ७ व्या पर्वा मध्ये सन्मान करण्यात आला.
महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील, नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने दरवर्षी “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण यांना उपस्थित करून, मान्यवरांच्या हस्ते द बेस्ट कॉस्टयुम डिझायनर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ही ढाणकी व मेट, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब असून, ग्रामीण भागातील युवा तरुण सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सिद्ध करून दाखवणारी बाब आहे. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यासाठी त्यांना सर्वत्र शुभेच्छा देण्यात येत आहेत.