दारूबंदीच्या गावात अवैध व्यवसाय करणे पडले महागात

55

-दामपुर गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : मुलचेरा तालुक्यातील दामपुर या गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथ, पोलिस विभाग व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कृती कार्यक्रम राबविण्यात आले. यामुळे मागील सहा महिन्यांपासून अवैध दारूविक्री बंदी होती. परंतु, गावातील एका दारूविक्रेत्यानी चोरट्या मार्गाने दारूविक्री सुरु केल्याची माहिती प्राप्त होताच, ग्रामस्थानी अहिंसक कृती करीत सहा हजार रुपये किमतीची २० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. सोबतच ठरावानुसार १० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला.
दामपुर गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपल्या गावात अवैध दारूविक्री नको, यासाठी दारूबंदीचा ठराव पारित केला. त्यानुसार गावातील अवैध दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करा अन्यथा कारवाईला पुढे जा असा इशारा देण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी करीत गाव संघटनेच्या महिला व ग्रामस्थांनी विविध उपाययोजना करून आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद केली. मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नामुळे गावातील अवैध दारूविक्री मागील सहा महिने बंद होती. गावात दारूबंदी असल्याने गावात शांतता व सुव्यवस्था निर्माण झाली होती. अशातच एका विक्रेत्याने विक्रीकरिता गावात दारू आणली असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गावातील संघटनेच्या महिलांनी एका घराची पाहणी केली असता जवळपास सहा हजार रुपये किमतीची २० लिटर मोहाची दारू मिळून आली.
संबंधित दारूविक्रेत्यावर ग्रामस्थांच्या ठरावानुसार कारवाई करण्यासाठी गावात बैठक घेऊन दारू विक्रेत्यावर १० हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.या समोर दारू विक्री केल्यास ग्रामसभेच्या ठरावानुसार २० हजार रुपये दंड, शासकीय योजना व दाखल्यांपासून वंचित व पोलिस कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, मुक्तिपथ संघटना अध्यक्ष सविता आत्राम, ICRP सुलोचना कोरेत, पोलिस पाटील सुरेश बुरमवार, सुगंधा आत्राम, पुष्पा आत्राम, कौशल्या कन्नाके, शिंधुबाई आत्राम, यशोधा आत्राम, निकिता आत्राम, मीराबाई आत्राम, सगुणा मडावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here