सुरजागड लोहप्रकल्पाच्या वाढीव उत्खननासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणीत नागरिकांचा प्रकल्पासाठी एकमताने होकार

83

– ३० गावांतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक, लोकप्रतिनिधीची उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, ता. २८ : उद्योगविहीन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाचा उजेड पेरत असलेल्या लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहप्रकल्पात होणाऱ्या वाढीव प्रकल्पाच्या उत्खननासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणीत नागरिकांनी या प्रकल्पासाठी एकमताने होकार दर्शविला असून औद्योगिक विकासासोबतच सर्वांगीण विकासाची रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे.
प्रकल्पाच्या परिसरातील ३० गावांतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार २८ जानेवारी रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. विशेष पाहुणे म्हणून खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरमी, उपसरपंच प्रशांत आत्राम, नागुलवाडीचे सरपंच गावडे, बुर्गीचे सरपंच व उडेराचे सरपंच तसेच प्रकल्पबाधित क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, गाव पाटील, भूमिया, गायता, पर्यावरण विभागाचे अधिकारी, परिसरातील जनसमुदाय तसेच लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक, युवक, युवतींच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे या भागातील युवक, युवती आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. लॉयड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून या भागात रोजगार निर्मितीला वेग देण्यात आला असून असून या ठिकाणी नव्याने तब्बल ६ हजार युवक, युवतींची पदभरती केली जाणार आहे. या कंपनीमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली. लॉयड्सने हेडरी येथे सुसज्ज असे रुग्णालय निर्माण करून अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील रुग्णांसाठी योग्य उपचाराची सोय करून दिली आहे. असेच रुग्णालय आलापल्ली किंवा अहेरी येथे सुरू करून या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसराचा विकास, आरोग्य, शिक्षण, रोजगाराची मागणी करतानाच पर्यावरण संतुलन राखले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. लॉयड्स मेटल्सने रुग्णालयासोबत परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली आहे. त्यामुळे या भागातील गरजू, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सोय झाली आहे. परिसरातील पर्यावरण व संस्कृतीला कुठलीही बाधा पोहोचणार नसल्याने शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधा निर्माण करण्याकडे कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य नागरिक, युवक, युवती, महिला उपस्थित होते.

दुसरी जनसुनावणीही खेळीमेळीच्या वातावरणात…

उद्योगविहीन आणि बेरोजगारीने गांजलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच औद्योगिक विकासाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या लॅायड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लि.च्या वाढीव प्रकल्पासंदर्भातील ही द्वितीय जनसुनावणी होती. यापूर्वी गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी जनसुनावणी अतिशय उत्साहात व शांततामय वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे पहिल्या जनसुनावणीतही विस्तारीकरणाअंतर्गत असलेल्या गावांतील नागरिकांनी लॅायड्सच्या लोहप्रकल्प विस्तारीकरणाचे एकमताने स्वागत केले. सोबतच स्थानिकांना रोजगार व आरोग्य, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या सुविधा पुरवण्याची मागणी कंपनीकडे केली. या द्वितीय जनसुनाणीतही नागरिकांनी एकही उद्योग नसलेल्या या जिल्ह्यात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उगवलेली रम्य पहाट विकासाचा प्रकाश देत बेरोजगार हातांना रोजगार आणि सर्व जिल्हावासींना सुख, समृद्धी देत रहावी, हीच अपेक्षा व्यक्त केली.

मान्यवरांनीही केले स्वागत…

या जनसुनावणीत उपस्थित खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार आदी मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून प्रकल्पाचे स्वागत केले. उद्योगविहीनतेमुळे समस्यांच्या गर्तेत आणि नक्षलवादाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्याला लॉयड मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा प्रचंड वेगाने विकास होत असल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद…

मे. लॉयड मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.,सुरजागड, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली यांनी त्यांच्या कार्यरत असलेल्या खाणीच्या ३४८.०९ हेक्टर क्षेत्रामध्ये १० ते २६ दशलक्ष टन प्रतिवर्ष हेमॅटाइट, ४५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (बीएचक्यू प्लांट), ३ × १५ (४५) दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे कमी दर्जाचे लोह खनिज / बँडेड हेमॅटाईट क्वॉर्टझाईट (बीएचक्यू), ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष घनकचरा (एकूण उत्खननः ६० दशलक्ष टन प्रतिवर्ष) यासह सुरजागड लोह खनिज खाणी लीज क्षेत्रावरील क्रशिंग आणि स्क्रिनिंग प्लांटसह लोह खनिज उत्पादन क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यरण विषयक जनसुनावणी घेण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूरकडे अर्ज सादर केला होता. एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी, मोहर्ली, कारमपल्ली, एकरा खुर्द, झारेवाडा, पेठा, मरकल, रेकनार, आलदंडी, परसलगोंदी, पुरसलगोंदी, हेडरी, बांडे, मुंगेर, गोडेल, इतलनार, सुरजागड, नेंडेर, मलमपाड (मल्लम पहाडी) ही गावे या प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात येणार आहेत. या प्रस्तावित प्रकल्पाकरिता भारत सरकारच्या पर्यावरण व वने व मंत्रालय, नवी दिल्लीच्या १ डिसेंबर २००९च्या सुधारित अधिनियमान्वये ही पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. जनसुनावणीला उपस्थित प्रभाव क्षेत्रातील सर्वच गावांतील नागरिकांनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे व आनंदाने स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here