The गडविश्व
गडचिरोली, २९ मे : नुकताच २८ मे ला दिल्ली येथे नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येत होते. त्याच दिवशी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी हे गडचिरोली जिल्हा भामरागड तालुक्यातील बिनागुंडा व परिसरातील गावांना भेट दिली व त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. एका बाजूला महामहीम राष्ट्रपती यांचा लोकशाहीतील संसद भवनाचा उद्घाटनाचा हक्क हिरावून घेतला, तर दुसऱ्या बाजूला अतिशय दुर्गम नक्षलग्रस्त बिनागुंडा परिसरातील गावांचा विकासाचा हक्क सुद्धा हिरावून घेतल्याचे आढळले.
बिनागुंडा हे गाव लाहेरी पासून २९ किलोमीटर अंतरावर असून सुद्धा लाहेरी ते बिनागुंडा जाण्यासाठी रस्ता नसल्याने जवळपास तीन तास लागतात. तसेच पावसाळ्यात व हिवाळ्यात रस्ता नसल्यामुळे त्या भागातील आजारी व्यक्तींना लाहेरी पर्यंत आणण्यासाठी त्या भागातील लोकांना खाटेचा स्ट्रेचर करून संपूर्ण दिवस पायी चालून लाहेरी येते आणावे लागते. त्यामुळे बरेचदा गरोदर माता मलेरिया व वेगवेगळ्या आजारीच्या रुग्णांना लाहेरी येथे आणतानाच मृत्यू पावतात. तसेच बिनागुंडा येथे आरोग्य उपकेंद्र असून सुद्धा नियमित आरोग्य सेविकेची नियुक्ती नसल्यामुळे स्थानिक पातळीवर आपत्कालीन उपचारापासून सुद्धा तेथील लोकांना मुकावे लागते. स्थानिक पातळीवर ए एन एम च्या दोन-तीन मुली देखील शिक्षण घेतलेले असून, त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केल्यास त्या स्थानिक ठिकाणी राहून प्राथमिक उपचार रुग्णांना देऊ शकतात. परंतु शासन व जिल्हा परिषद यांच्याकडे लोकांनी वारंवार नियुक्ती करण्याचे विनंती करून सुद्धा नौकर भरती बंद असल्याने त्यांची नियुक्ती रखडलेली आहे. या भूमिकेमुळे एका बाजूला सेवा देणाऱ्या नर्सेस बेरोजगार आहेत. तर दुसऱ्या बाजूला जनता आरोग्य सेवेपासून वंचित आहे. हा विरोधाभास शासन दूर करेल काय हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्याच प्रकारे या भागात वीज पुरवठा न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोलर लाईटची व्यवस्था केल्यास काही प्रमाणात विजेचा प्रश्न सुटू शकतो. परंतु याकडे सुद्धा शासन स्तरावरून दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. बिनागुंडा येथे नॅशनल सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट नागपूर द्वारा संचालित, विनोबा भावे प्राथमिक आश्रम शाळा बिनागुंडा याची सुरुवात १९८८ पासून झालेली आहे. एकंदरीत १०० विद्यार्थी या आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत. आश्रम शाळा असतानासुद्धा ३४ वर्षात सुसज्ज आश्रम शाळेची इमारत होऊ शकलेली नाही. आजही बांबूच्या तट्याचा व टिनाच्या इमारतीवर ही आश्रम शाळा भरत आहे. परंतु आश्रम शाळेमध्ये सुद्धा नियमित दर्जेदार शिक्षणाचा अभाव असून पावसाळ्यात या आश्रम शाळा बंदच असते. फक्त हिवाळा उन्हाळ्यामध्ये अधून मधून सुरू असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या भागातील जमीन सपाट नसल्यामुळे उत्पादनाची साधने सुद्धा अपुरी आहेत. तसेच संजय गांधी श्रावण बाळ या योजनांच्या किचकट अटीमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या योजनेपासून सुद्धा येथील नागरिक वंचित आहेत. या नागरिकांना या योजनांचा लाभ द्यायचा असल्यास बिनागुंडा येथे प्रशासनाने विशेष शिबिर घेऊन तेथील लोकांचे अर्ज भरून घेतल्यास या भागातील या योजनांचा लाभ होऊ शकतो. बिनागुंडा परिसराला निसर्गाने भरभरून दिलेली आहे. अहेरी मध्ये ४५ अंश तापमान असल्यास बिनागुंडा परिसरात मात्र २५ अंश तापमान असतो. येथील निसर्गरम्य नद्या, नाले, पहाड, गडचिरोली जिल्ह्यातील काश्मीर आहे की काय असा प्रकारचा नैसर्गिक सौंदर्य या भागाला लाभलेला आहे. बिनागुंडा येथील धबधबा हा उन्हाळ्यात सुद्धा वाहत असल्याने शासनाच्या माध्यमातून पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास पर्यटकांकडून काही प्रमाणात येथील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर श्रीकांत जिचकर नंतर आजपर्यंत कोणत्याही खासदार आमदारांनी या गावांना भेटी दिल्या नाहीत या गावाला राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक दृष्टिकोन ठेवून विकास करण्याची राजकीय इच्छाशक्ती असल्यास या भागाचा विकास होऊ शकतो. परंतु या भावनेचा राज्यकर्ते व प्रशासनामध्ये अभाव असल्याने स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतरही या भागाचा विकास हिरावल्या गेलेला आहे. एका बाजूला स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव साजरी करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु बिनागुंडा परिसरात राहणाऱ्या आदिम जमातीच्या विकासासाठी नियोजन न करणे हा स्वतंत्र्याचा फार मोठा अपमान आहे असे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, binagunda, laheri, dr. namdeo holi)