– कुटुंब आर्थिक अडचणीत
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २९ : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जिल्ह्यात प्रभावितपणे राबविण्यात येत असली तरी मजुरांना कामाचा मोबदला वेळीच मिळत नसल्याने या योजनेबाबत मजुरांमध्ये नाराजीचा सूर आहे. धानोरा तालुक्यातील जवळपास ७००१ मजुरांची ११ करोड ५५ हजार २४० रूपये मजुरी प्रलंबित अकुशल कामाची आहे. तर प्रलंबित साहीत्याची रक्कम ४५५.१९ करोड आहे. परिणामी तालुक्यातील मजूर आर्थिक अडचणी सापडले आहेत. आतापर्यंत केलेल्या कामाच्या मजुरीची रक्कम मिळाली नाही याबाबत शासन स्तरावर कमालीची उदासीनता दिसून येते. तर मजुरावर उपासमारी येऊन ठेपली आहे.
ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे व हाताला काम देण्याबरोबरच कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात मात्र काम करूनही मजुरांच्या बँक खात्यामध्ये मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत व पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत.
रोजगार हमी योजनेतून केंद्र सरकारच्या वतीने नोंदणीकृत मजुरांना शंभर दिवसाचे काम उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत यंत्रणास्तरावर ५० टक्के आणि ग्रामपंचायत स्तरावर ४० टक्के कामे केली जातात. यात शासनाच्या परिपत्रकानुसार कुशल कामे ४० टक्के तर अकुशल कामाचे प्रमाण ६० टक्के ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात जनावरांचे गोठे, फळबाग लागवड ,शेळी कुकुटपालन शेड, शेततळे, नाफेड खत, गांडूळ खत, वैयक्तिक शौचालय नवीन सिंचन विहिरी अशा १४ प्रकारच्या योजना साठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. रोहयो योजनेच्या कामावरील मजुरांची पंधरा दिवसाच्या आत त्याच्या मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तसा रोहोयोचा नियम पण आहे. खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क, व्याजांसह मजुरीची रक्कमदा केली जाते. विलंबासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेकडून ही रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे. रोहयो च्या कायद्यान्वये कुशल कामे ४० टक्के तर अकुशल कामाचे प्रमाण ६० टक्के ठेवणे आवश्यक आहे व कुशल म्हणजे मजुराकडून केली जाणारी कामे आणि अकुशल म्हणजे यंत्राद्वारे तसेच कंत्राट द्वारा मार्फत केली जाणारी कामे होत. शासनाकडे मजुराच्या मजुरीची रक्कम प्रलंबित तर आहे तसेच कुशल कामाचे साहित्य पुरवठ्याचे ४५५.१९ करोड रुपये प्रलंबित आहेत.