टिपागड परिसरात पुरून ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट

3394

– नक्षली ‘कुकर’ चा असाही करतात वापर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यातील उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोस्टे गैरापत्ती हद्दीमध्ये असलेल्या टिपागड पहाडी जंगल परिसरामध्ये नक्षल्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात पुरून ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याची कारवाई आज ०६ मे रोजी करण्यात आली. सदर कारवाईने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे. घटनास्थळी स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ०६ प्रेशर कुकर व स्फोटकांनी आणि गंजलेल्या लोखंडी तुकड्यांनी भरलेले ०३ क्लेमोर पाईप्स देखील सापडले. उर्वरित ३ क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. तसेच पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट देखिल सापडले. १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकूण ९ आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. दैनंदिन जीवनात नागरिक कुकरचा स्वयंपाक घरात वापर करतात मात्र नक्षली त्या कुकरचा वापर स्फोटक तयार करण्यासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हयात नक्षली शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर नक्षल्यांकडून विविध नक्षल सप्ताहात, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो. टिपागड पहाडी जंगल परिसरामध्ये नक्षल्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स तसेच पोलीस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे. अशी गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी त्या भागात शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलाचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स/स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशीर मिळालेल्या माहितीच्या आधारे टिपागड पहाडी जंगल परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकिस आल्याने पोलीस अधीक्षकनीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी तातडीने ०२ बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी ६० चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले. आज ०६ मे रोजी सकाळी स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ०६ प्रेशर कुकर व स्फोटकांनी आणि गंजलेल्या लोखंडी तुकड्यांनी भरलेले ०३ क्लेमोर पाईप्स, गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट आढळून आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण १ आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. यासोबतच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जाळून नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती पोलीस दलने दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, बीडीडीएस पथक व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षल्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal #tippagadh #ipl2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here