The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालय १५ वर्षाखालील लहान मुलांना विशेष आरोग्य सुविधा प्रदान करीत आहे. बाह्यरुग्ण विभागात नोंदणी फी, सर्च मधील सर्व प्रयोगशाळा तपासणी, ईसीजी, एक्सरे व डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत देण्यात येत आहे. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, ईईजी, २डी ईको ॲन्जिओग्राफी, थॉयरोकेअर, बेरा ऑडिओमेट्रि, पेट स्कॅन, कॅन्सर मार्कर, एमआरआय इत्यादि सर्च बाहेरील तपासणी या मोफत दरात करण्यात येत आहेत. तसेच आंतररुग्ण विभागात रुग्ण भरती दरम्यान कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच १५ वर्षा खालील लहान मुलांना ऑपरेशनची आवश्यकता असेल अशा सर्व रुग्णांना मोफत ऑपरेशन सुविधा देण्यात येत आहे.
सर्च रुग्णालयामध्ये मागील १८ वर्षापासून ऑपरेशन शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने नागपुर सांगली, सातारा, पुणे व मुंबई येथून अनुभवी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक (सर्जन) हे सर्च रुग्णालयात नियमित सर्जरी कॅम्पसाठी येत असतात. लहान मुलांचे हर्निया, हायड्रोसील, शरीरावरील गाठ, ओठखंड, फाटलेला टाळू ,चेहऱ्यावरील धमनीविरोधी विकृती , तिरपी मान, काखेमधील सूज , जळलेल्या त्वचेचे संकुचन , जन्मता: जोडलेली बोटे, सामान्य पेक्षा जास्त बोटे, मूत्रमार्ग लिंगाच्या खाली उघडणे , लघवी पातळ येणे, अपरिचित अंडकोष/ अंडकोष अविकसित असणे अशी लक्षणे असलेल्या १५ वर्षाखालील मुलांना सर्च रुग्णालय ऑपरेशनसाठी निवड करून मोफत ऑपरेशन सुविधा प्रदान करीत आहे. तसेच रुग्ण भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मोफत मेससुविधा देण्यात येत आहे. सर्च रुग्णालयात ऑपरेशन शिबिरादरम्यान होतात तरी रुग्णालयात येऊन वरील पैकी कोणतेही लक्षणे असल्यास ऑपरेशन पूर्व तपासणी करून घ्यावी व आपल्या नावाची नोंदणी करून उपचार सुविधेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे. 16 ते 31 मे दरम्यान उन्हाळी सुट्टी निमित्त रूग्णालय बंद राहील.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )