– ०१ कोटी ०३ लाखाचे बक्षिस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जहाल महिला नक्षली ताराक्कासह ११ नक्षल्यांनी आज ०१ जानेवारी २०२५ रोजी आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी माओवादी संघटनेमध्ये गेल्या ३८ वर्षापासुन सक्रिय असलेल्या जहाल महिला नक्षलीडिकेएसझेडसीएम (दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य) ताराक्का (सीसीएम सोनु ऊर्फ भुपती याची पत्नी) सह तीन डीव्हीसीएम (divisional committee member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक उप-कमांडर, दोन एसीएम area committee member) व चार सदस्य पदावरील अशा एकूण आकरा दहा जहाल वरिष्ठ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ०१ कोटी ०३ लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ वत्सला ऊर्फ ताराक्का, (डिकेएसझेडसीएम, डिके मेडीकल टिम इंचार्ज) (वय ६२), रा. किष्टापूर, तह. अहेरी, जि. गडचिरोली, सुरेश बैसागी ऊईके ऊर्फ चैतु ऊर्फ बोटी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)), (वय ५६), रा. पल्ले, तह. भामरागड, जि. गडचिरोली, कल्पना गणपती तोर्रेम ऊर्फ भारती ऊर्फ मदनी (डिव्हीसीएम, कुतूल एरीया कमिटी (डॉक्टर/कृषी विभाग)) (वय ५५), रा. किष्टापूर तह. अहेरी, जि. गडचिरोली,अर्जुन तानु हिचामी ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश (डिव्हीसीएम, राही दलम), (वय ३२), रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली,वनिता सुकलु धुर्वे ऊर्फ सुशिला, (एसीएम, भामरागड दलम) (वय ३१), रा. चिमरीकल, तह. धानोरा, जि. गडचिरोली, सम्मी पांडु मट्टामी ऊर्फ बंडी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) (वय २५), रा. बेरेलटोला, तह. पाखंजूर, जि. नारायणपूर (छ.ग.), निशा बोडका हेडो ऊर्फ शांती (उप-कमांडर, पेरमिली दलम), (वय ३१), रा. मेंढरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, श्रुती उलगे हेडो ऊर्फ मन्ना (सदस्य, कंपनी क्र. १०), (वय २६), रा. मोहंदी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, शशिकला पत्तीराम धुर्वे ऊर्फ श्रुती (सदस्य, पश्चिम सब झोनल प्रेस टिम) (वय २९) वर्षे, रा. कोसमी नं. १, तह. धानोरा, जि. गडचिरोली, सोनी सुक्कु मट्टामी (सदस्य, राही दलम) (वय २३) , रा. टेकामेट्टा, तह. पाखंजूर, जि. नारायणपूर (छ.ग.) व आकाश सोमा पुंगाटी ऊर्फ वत्ते (सदस्य, प्लाटुन क्र. ३२ (नीब)) (वय २०), रा. मेतावाडा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच वर्षी २२ जून २०२४ रोजी गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी आणि सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृह मंत्री (आताचे मुख्यमंत्री) यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विगातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता.
सदर गडचिरोली दौयादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिसंवेदनशिल गर्देवाडा येथे भेट देऊन ३० किलोमिटर लांबीच्या गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी रस्त्याचे आणि ताडगुडा येथील नवीन पुलाचे उद्घाटन केले. यासोबतच गट्टा ते गर्देवाडा व त्यापुढे वांगेतुरी (छत्तीसगड सिमेवरील शेवटचे पोलीस मदत केंद्र) या मार्गावर जाणाया एस.टी. बसचे शुभारंभ करण्यात आले. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे एटापल्ली व अहेरी तालुका मधील सर्व जवानांना व गावकयांना वर्षभर सहज प्रवास करता येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलामार्फत ११ डिसेंबर २०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोमकें पेनगुंडा येथे भेट देऊन पोमकें पेनगुंडा येथील जवानांच्या अभियाणाच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोमकें पेनगुंडा येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ व सी-६० च्या जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशिल ठिकाणी पोमकें स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली. यासोबतच पोमकेंच्या स्थापनेनंतर केवळ २० दिवसांच्या आतच पेनगुंडा गाव व आजुबाजुच्या परिसरात 4जी मोबाईल कनेक्टीव्हिटी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गडचिरोली पोलीसांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री यांचे हस्ते पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात अतिदुर्गम पोमकें पेनगुंडा हद्दीतील १००० हून अधिक नागरीक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधताना सांगितले की, रस्ते, पूल आणि मोबाईल टॉवर्सच्या बांधकामांसह या भागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
यावेळी आयोजित गडचिरोली येथील कार्यक्रमादरम्यान गडचिरोली पोलीस दलासाठी पवनहंस कंपनीकडुन उपलब्ध असलेल्या एएलएच हेलीकॉप्टरच्या सुरक्षेसाठी नवीन तयार करण्यात आलेल्या हॅगरचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते गडचिरोली पोलीस दलातील जवानांचे अस्सीम शौर्य व त्यागाबाबतच्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेले सन २०२५ चे टेबल कॅलेंडरचे विमोचन व गडचिरोली पोलीस दलास जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या वतीने माओवाद विरोधी अभियान व चार्ली पेट्रोलिंग करीता प्राप्त १९ चारचाकी व ३० दुचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर १७ जुलै २०२४ रोजी विशेष अभियान पथकातील जवानांनी छत्तीसगड सिमेजवळील वांडोली गावाजवळील जंगल परिसरात १२ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालुन संपूर्ण उत्तर गडचिरोलीतील सर्व सशस्त्र माओवादी संघटनेचा नायनाट केला होता. या कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभियानात सहभागी सी-६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले होते. सदर बक्षिसाच्या रक्कमेतून सी-६० जवानांना नक्षलविरोधी अभियानात उपयोगात येणाया साहित्यांच्या किटचे वाटप मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी विधानसभा निवडणूकी दरम्यान कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये ०२ डिव्हिसीएम नक्षल्यांसह एकुण ०५ कट्टर नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विशेष अभियान पथकातील जवानांचा प्रशस्तिपत्र देवुन सत्कार केला. यासोबतच कोपर्शी चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, भा.पो.से. व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, भा.पो.से यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जिवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन केले.
या विविध कार्यक्रमांसाठीराजे धर्मरावबाबा आत्राम, आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र, डॉ. मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ, डॉ. दिलीप पाटील भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र अतिरीक्त कार्यभार पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, जय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली, नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, यतिश देशमुख अपर पोलीस अधीक्षक (अभियान), एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालय, गडचिरोली तसेच सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते आतापर्यंत एकुण ४४ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी मागील एका वर्षात (आज आत्मसमर्पित झालेल्या ११ नक्षल्यांसहित) एकुण ३१ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.