गडचिरोली : ‘कवसेर’ उपक्रमातून १७७ बालके कुपोषणमुक्तीकडे

98

The गडविश्व
गडचिरोली,दि.२६ : कुपोषणमुक्त गडचिरोली करीता राबविण्यात येत असलेल्या ‘कवसेर’ या उपक्रमात मागील ३० दिवसांचा आढावा घेण्यात आला असता तीव्र कुपोषित श्रेणीतील जिल्ह्यातील एकुण ६१५ कुपोषीत बालकांपैकी १७७ बालकांमध्ये सुधारणा घडुन आली असून १६७ दुर्धर आजारी बालकांपैकी ७४ बालकांवर उपचार करण्यात आले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने सादर केला आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतुन कुपोषण मुक्त गडचिरोली करीता प्रोजेक्ट कवसेर २ टप्यामध्ये राबविण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात १ मे ते १५ ऑगष्ट २०२४ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामधील बालकांना तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित श्रेणीमधुन मुक्त करणे. तर १६ ऑगष्ट ते १४ नोव्हेबंर २०२४ या कालावधीमध्ये द्वितीय टप्प्यात वजनानुसार तीव्र व मध्यम या कुपोषीत श्रेणीमधुन मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
वरील उद्दीष्टांच्या पुर्ततेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महीला बाल विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने सुरवातीला ६ मे ते १६ मे २०२४ या कालावधीत अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे वजन, उंची घेऊन तथा आरोग्य तपासणी करुन निदानात्मक अभीयान राबविण्यात आले यामध्ये पहील्या टप्यात सर्वात जास्त धोका असणाऱ्या म्हणजेच तीव्र कुपोषित श्रेणीतील बालकांना ग्राम बाल विकास केंद्र , – पोषण पुनर्वसन केंद्र, बाल उपचार केंद्रामध्ये दाखल करुन आहार, आरोग्य सुविधा, कुटूंब मार्गदर्शन याद्वारे बालकांच्या आरोग्य व आहारामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला तसेच अंगणवाडी आपल्या दारी, पोषण जागर या सारखे उपक्रम राबवुन कुपोषण निर्मुलनासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचा व बालकांवर झालेल्या परिणामांचा ३० दिवसांचा आढावा (१६ मे ते १५ जुन २०२४) घेतला असता १७७ बालकांमध्ये सुधारणा घडुन आल्याचे दिसून आले.
याशिवाय जिल्हयातील कुपोषणावर आळा घालणेकरिता सामाजिक जबाबदारी (सिएसआर) निधीतून पेसा/सर्वसाधारण क्षेत्रातील अंगणवाडी केन्द्रातील स्तनदा माता यांना बाळंतविडा किट व सर्वसाधारण क्षेत्रातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना महिन्यातून २५ दिवस याप्रमाणे ३०० दिवस प्रती बालक १ अंडा देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडयांचे बळकटीकरणाकरिता ४ अंगणवाडी इमारतीचे बांधकामे सुरु आहेत व पुनश्च १० अंगणवाडी इमारत बांधकाम प्रस्तावित असल्याचे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोल यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kavser)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here