– ३ दिवसाची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, १० सप्टेंबर : गोपनिय माहितीच्या आधारे उपविभाग भामरागड हद्दीतील पोलीस मदत केंद्र ताडगाव, पोमके नारगुंडा व पोस्टे. भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना ०३ जहाल नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांवर ६ लाखांचे बक्षीस जाहीर होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका (२८), मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी, (२३) दोघेही रा. हलवेर तह. भामरागड, जि. गडचिरोली, अशोक लाला तलांडी (३०) रा. पासेवाडा, तह. कुडरु, जि. बिजापुर (छ.ग.) यांचा समावेश आहे अशी माहिती पोलीस दलाने दिली आहे.
७ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे उपविभाग भामरागड हद्दीतील पोलीस मदत केंद्र ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. १४/२३ कलम ४३५, ३९५, ३२४, १४३,१४८,१४९, १२० (ब), ३४१, ५०६, ४०७ भादंवी सहकलम ५/२८ भाहका, सहकलम १३५ महा.पो.का मध्ये पाहीजे असलेले जहाल नक्षली सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका व मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना मा. न्यायालयाने ०३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच ९ सप्टेंबर रोजी उपविभाग भामरागड येथील पोमके नारगुंडा व पोस्टे. भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात अशोक लाला तलांडी रा. पासेवाडा, तह. कुडरु, जि. बिजापुर (छ.ग.) हा लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोमकें नारगुंडा पोलीस पार्टी, डी-३७ बटा. सिआरपीएफ व विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना त्याला ताब्यात घेण्यात आले.
सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका (२८), मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी, (२३) दोघेही रा. हलवेर तह. भामरागड यांचा २८ फेब्रुवारी २०२३ रोजी विसामुंडी जवळ विसामुंडीला जोडणाऱ्या पुलावर काम करणाऱ्या ठेकेदाराचा मिक्सर व जेसीबी जाळला होता. सरजु हा सन २०१० मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत होता. त्याचा रेंगेवाही चकमक, नारगुंडा चकमक (२०११), कुंजेमर्का चकमक व मर्दहुर चकमक (२०१७) असे ०४ चकमक व घोटपाडी व पेनगुंडा येथील ०२ निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता. तसेच माओवादी मधु हा सन २०१५ मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन सन २०१७ पर्यंत कार्यरत होता. त्याचा मुत्तेमकुही चकमक, दरबा चकमक (२०१७), कुंडुम चकमक (२०१६) अशा एकुण ०३ चकमक व गोंगवाडा व घोटपाडी येथील ०२ निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता. तर अशोक लाला तलांडी हा २०१७ मध्ये छत्तीसगड येथील सँड्रा दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाला व त्यानंतर मागील ०२ वर्षापासुन स्वत:चे घरी राहुन माओवादी चळवळीमध्ये अधूनमधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यरत होता. तसेच ३० एप्रिल २०२३ रोजी केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीमध्ये ०३ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. तसेच पोस्टे भामरागड येथे अप. क्र. ३७/२३ अन्वये यासंदर्भाने गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. यासोबतच सन २०१८ मध्ये गोरटुल ते बडाकोक्केर जाणाऱ्या रस्त्यावर व चेरपल्ली ते एडापल्ली जाणाऱ्या बैलगाडी रस्त्यावर बॉम्ब लावण्यात तसेच मौजा गोरटुल येथील ०१ निष्पाप व्यक्तीच्या खुनात त्याचा सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने या तिन्ही माओवाद्यांवर प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७० माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितिन गणापूरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.