-दोघींची मृत्यूशी झुंज सुरू, प्रकृती गंभीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हिदूर येथील तीन महिलांना रानटी हत्तीने हल्ला करून जखमी केले होते. दरम्यान तिघींवर चंद्रपुरात उपचार सुरू होते मात्र मृत्यूशी झुंज देत असतानाच त्यातील त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राजे कोपा हलामी (५०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर इतर दोघी महारी देवू वड्डे (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी (४७) ह्या गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
२५ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास रानटी हत्तीने पायाखाली तुडवून ठार केल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याच हत्तीने आपला मोर्चा हिदूर गावात वळवत उपद्रव माजवाला. यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपचार करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असताना राजे कोपा हलामी यांची २६ एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली. तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून दहशतीत आहेत. रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. वनविभागामार्फत हुल्ला पार्टी, ड्रोन कॅमेराने रानटी हत्तीवर पाळत ठेवण्यात येत असल्याचेही माहिती आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #bhamragadh #hidur #kiyar #wildelephant #forestgadchiroli )