गडचिरोली : पुन्हा एका जहाल नक्षलीस केली अटक

3076

– आठवड्यातील दुसरी कारवाई, २८ पर्यंत पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, २४ फेब्रुवारी : मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाच्या जवानांनी दामरंचा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून एका जहाल नक्षलीस गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी अटक केल्याची माहिती पोलीस विभागामार्फत प्राप्त झाली आहे. वेल्ला केसे वेलादी (३५) रा. येडापल्ली तह. भोपालपट्टनम्, जि. बीजापूर, (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे.
फेब्रुवारी ते मे महिण्यादरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलीस अटक केली.
अटक करण्यात आलेला नक्षली वेल्ला केसे वेलादी हा सन २००१ पासुन जनमिलीशीया म्हणुन नक्षलचे काम करत होता. त्यानंतर सन २००६ पासुन दिलीप आणि मंगी ( सँड्रा) दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याचा सप्टेंबर २०२१ साली मडवेली जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता. तसेच त्याचा २३ डिसेंबर २०२२ रोजी टेकामेटा जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सहभाग असून या चकमकी दरम्यान त्याने छत्तीसगड दलमचा डीव्हीसीएम भास्कर यास पळून जाण्यास मदत केली होती अशी माहीती चौकशी वरुन मिळाली. त्याचा जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्ह्यामध्ये सहभाग असून, त्यास २०२१ साली मडवेली जंगल परिसरात झालेल्या चकमक या गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्याला मा. न्यायालयापूढे हजर केले असता २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली असुन, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी शयतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Gadchiroli Police) (Naxal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here