The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली ते असरअल्ली मार्गावरील एस.टी. बस आज दुपारी मुक्तापूर येथे अचानक बंद पडली आणि २५ ते ३० प्रवाशांना उष्णतेत तासन्तास ताटकळत राहावे लागले. महिलांपासून लहानग्यांपर्यंत व रुग्णांपर्यंत सर्वांनी उन्हाच्या झळा सहन केल्या.
अहेरी डेपोच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा संताप उफाळून आला. पर्यायी बस न पाठवल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा कन्व्हर्जन्स समितीच्या सरिता किरंगे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने अखेर सायंकाळी ४.३० वाजता दुसरी बस धाडण्यात आली.
दरम्यान, प्रवाशांनी गडचिरोली-असरअल्ली मार्गावर कायमस्वरूपी दोन बस सेवा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
