गडचिरोली-चिमूर लोकसभा मतमोजणी : ९०० सुरक्षा रक्षक राहणार तैनात

248

– निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांनी केली मतमोजणी व्यवस्थेची पाहणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : लोकसभा निडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी पार पडणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांचेकडून करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडली. ४ जून रोजी येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राहुलकुमार यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या :

१२- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी वेगवेगळ्या कक्षात होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबल लावण्यात आले आहेत. तसेच टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीसाठी १२ टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) साठी एक टेबल असे एकूण ९७ टेबल मतमोजणीसाठी लावण्यात आले आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या, आरमोरी २२ फेऱ्‍या, गडचिरोली २६, अहेरी २१, ब्रम्हपुरी २३ आणि चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या होणार आहेत. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.

मनुष्यबळ :

मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय व प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून एकूण ११७ मतमोजणी पर्यवेक्षक, १३० मतमोजणी सहायक, १२० सुक्ष्म निरीक्षक व इतर १०१ सहायक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्याव्यतिरिक्त २० टक्के कर्मचारी अतिरिक्त राहणार आहेत. तर प्रत्येक उमेदवाराला इव्हीएम मतमोजणी, इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे ९७ टेबलसाठी ९७ प्रतिनिधी नेमता येणार आहे.

सुरक्षा व्यवस्था :

मतमोजणी केंद्राच्या सभोवताली तब्बल ९०/ सुरक्षा रक्षक तैनात असून यात १०० मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत.

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध :

मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीकरिता कृषी विद्यालयाच्या उजव्या बाजूला वाहनतळाची सुविधा करण्यात आली आहे.

एकूण मतदार व झालेले मतदान :

१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार २०७ मतदारांची नोंद आहे. यात ८ लक्ष १४ हजार ७६३ पुरुष मतदार, ८ लक्ष २ हजार ४३४ स्त्री मतदार तर १० इतर मतदार आहेत. यापैकी ५ लक्ष ९५ हजार ३१५ पुरुष मतदारांनी (७३.०७ टक्के), ५ लक्ष ६७ हजार १५६ स्त्री मतदारांनी (७०.६८ टक्के) तर ५ इतर नागरिक असे ११ लक्ष ६२ हजार ४७६ (७१.८८ टक्के) मतदारांनी १९ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या मतदान पक्रियेत मतदानाचा हक्क बजावला आहे.

टपाली मतपत्रिका :

८५ वर्षावरील वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान प्रथमच गृहभेटी देवून टपाली मतपत्रिकेवर घेण्यात आले होते. त्यांचे व अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या एकूण ४९३९ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच सेनादलात कर्तव्यावर असलेल्या मतदारांच्या ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतपत्रीकांची मतमोजणी करण्यात येणार आहे. आजरोजीपर्यंत सेनादलातील मतदारांच्या ७९३ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

मतदान केंद्र :

लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण १८९१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. यात आमगाव ३११, आरमोरी ३०२, गडचिरोली ३५६, अहेरी २९२, ब्रम्हपुरी ३१६ तर चिमुर विधानसभा मतदारसंघात ३१४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती.

उमेदवार :

१२- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातून एकूण १० उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे. अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती), धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष (अंगठी).

सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज), आदित्य जीवने (अहेरी), कविता गायकवाड (आमगाव) व इतर संबंधीत अधिकारी यावेळी मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #loksabhaelection2024 #loksabha_election2024 #loksabhaelectioncounting)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here