गडचिरोली : सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत CRPF तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आरोग्य शिबिर

87

The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : डी/191 वी वाहिनी, केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) यांच्या वतीने गर्देवाडा (ता. एटापल्ली) येथे २६ मार्च रोजी सिविक एक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन सत्य प्रकाश, कमांडंट, 191 वी वाहिनी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजीव रंजन कुमार सिंह, द्वितीय कमान अधिकारी, 191 वी वाहिनी होते. तसेच निरीक्षक जितेंद्र कुमार, निरीक्षक काकडे ए.डी., पोलिस उपनिरीक्षक धनाजी शिंदे (पोलिस मदत केंद्र, गर्देवाडा), आरोग्य सेविका पुष्पा आलाम, आरोग्य परिचारिका कुंदा परशुरामकर व CRPF चे अधिकारी-जवान उपस्थित होते.
सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत गर्देवाडा व परिसरातील अतिदुर्गम पुस्कोटी, हाचबोडी, मर्दकुही, रेकलमेटा, रंगाटोला, मुरेवाडा, नैताला, कोईनवर्षा येथील 450 ग्रामस्थांना मोठे गंज, कढई, गॅस शेगडी, सोलार लाईट, कॅरम बोर्ड, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट किट, प्लास्टिक खुर्च्या तसेच ब्लँकेट यांसारख्या जीवनावश्यक व मनोरंजनाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य सेविका व परिचारिका यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराद्वारे ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली आणि भारत सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान गर्देवाडा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रमुख पाहुणे राजीव रंजन कुमार सिंह यांनी आपल्या संबोधनात सिविक एक्शन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश वामपंथी उग्रवादग्रस्त भागातील युवक-युवतींना संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणे आणि पोलीस व स्थानिक नागरिक यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी उपस्थित ग्रामस्थ, पत्रकार, आरोग्य सेवक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here