– पत्रकार परिषदेतून कारवाई करण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या श्रीगुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळेतील दोन शिक्षकांवर, एका विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याच्या खोट्या आरोपाखाली, काही समाजकंटकांनी खंडणी मागितल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याबाबत शिक्षकांनी आज गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकार सांगितला.
शाळेतील माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्याम पांडुरंग धाईत आणि प्राथमिक विभागातील शिक्षक दिलीप भिवाजी राऊत यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित, स्थानिक पोलीस व प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले.
धाईत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी इयत्ता ८ वीच्या वर्गात गणिताच्या तासादरम्यान, अनवधानाने एका विद्यार्थिनीच्या पायाला पाय लागल्याची घटना झाली. ही बाब तत्काळ लक्षात घेत त्यांनी संबंधित विद्यार्थिनीला मागे बसण्यास सांगितले. मात्र, ही किरकोळ बाब गाजवून
संतोष रामचंद्र ताटीकोंडावार, रा. कमलापुर व श्रीनिवास गावडे, रा. उमानुर व इतर यांनी त्यांच्यावर असभ्य वर्तनाचे खोटे आरोप लावत, थेट १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे यावेळी सांगितले.
इतकेच नव्हे तर, या प्रकरणाची डिल आज सायंकाळपर्यंत झाली नाही, तर बनावट व्हिडीओ तयार करून पत्रकार परिषद घेण्याची धमकीही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. याशिवाय, इतर विद्यार्थिनींना आमिष दाखवून खोट्या तक्रारी करून घेण्याचाही डाव असल्याचे धाईत यांनी म्हटले आहे.
“गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून जिवे मारण्याची आणि गावात राहू न देण्याचीही धमकी दिली जात आहे,” अशी धक्कादायक माहिती त्यांनी अर्जात नमूद केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मागणी केली आहे की, एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. तसेच, खंडणीखोरांविरुद्ध तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, जेणेकरून शिक्षणसंस्थांचे पावित्र्य अबाधित राहील.
शिक्षकांवर होणारे खोटे आरोप ही शिक्षणव्यवस्थेवर कलंक ठरणारी गोष्ट असून, प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे. सदर तक्रारा अर्ज देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा, अशोक उईके – आदिवासी विकासमंत्री, महाराष्ट्र शासन, सचिव – आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, अप्पर आयुक्त – आदिवासी विकास विभाग, नागपूर, अशोक नेते – माजी खासदार, चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र, मिलींद नरोटे – आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र, देवराव होळी – माजी आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र, प्रकल्प अधिकारी – आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय, अहेरी, अजय कंकडालवार – माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली, विजय खरवडे – जिल्हाध्यक्ष, भारतीय जनसंसद व राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, गडचिरोली, उपपोलीस निरीक्षक – उप पोलीस स्टेशन, रेपनपल्ली यांना पाठविले आहे.
सदर प्रकरणाबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
