The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय मिनी सरस-विक्री व प्रदर्शन कार्यक्रम उद्या, ०६ मार्च ते १० मार्च २०२५ पर्यंत, अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीसाठी जिल्ह्यातील ७५ स्वयं सहाय्यता गट सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनीमध्ये मध, जांभूळ, सिताफळ यांचे प्रक्रिया करून तयार केलेले विविध पदार्थ, मोहाचे पदार्थ, लाकडी शोभेच्या वस्तू, आंब्यापासून तयार केलेले पदार्थ, मच्छी लोंचे इत्यादी समाविष्ट असतील.
प्रदर्शनी दरम्यान ग्रामीण भागातील अस्सल गावरान पद्धतीच्या विविध पदार्थांची चव चाखता येईल. याशिवाय लाकडी वस्तू, दागिने, ड्रेस मटेरियल, घरगुती मसाले, गावरान दाळी, कुरडया, पापड्या, आंबा लोनचे, मच्छी लोनचे, व्हेज-नॉव्हेज जेवणाची दुकाने लावली जातील. भजी-भाकरी, पुरणपोळी, ज्वारी भाकरी, भरीत भाकरी, चिकन भाकरी, इडली, अप्पे, साबुदाना वडे, मोहाचे विविध पदार्थ अशा अनेक खाद्य स्टॉल्स लावले जातील. जिल्हावासीयांना ०६ ते १० मार्च २०२५ दरम्यान प्रदर्शनीला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दररोज रात्री ७ वाजता सांस्कृतिक मेजवाणी अंतर्गत लोकसंगीत, महिलांचे डान्स, आदिवासी संस्कृती दर्शन कार्यक्रम, अधिकारी कर्मचाऱ्यांचे डान्स अशा विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातील.

महिलांना प्रोत्साहन द्या आणि वस्तू खरेदी करा
ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मिनी सरस प्रदर्शन व विक्री ०६ ते १० मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देऊन महिलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन राजेंद्र एम. भुयार, जिल्हा अभियान सहसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली यांनी केले आहे.