– पाण्याची पातळी वाढल्यास शिक्षणापासून मुकणार विद्यार्थी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १३ : सध्या देश अमृत महोत्सव साजरा करिता आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाल्याचा दिडोंरा लोकप्रतिनिधी व प्रशासन पिटतात आणि धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जिवावर उदार होऊन, जीव धोक्यात घालून नदीतून वाट काढत शाळा गाठावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरच जिल्हाचा विकास झाला का? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
धानोरा तालुक्यातील साखेरा आणि इतर गावातून कारवाफा येथे शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना पोटफोडी नदीच्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या नदीवर उभारल्या जात असलेल्या नवीन पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून जाताना कपडे भिजण्यासह पाय घसरून प्रवाहात वाहून जाण्याचाही धोका या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे.
नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यावर विद्यार्थ्यांना नदिमधून वाट काढणे कठीण असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकायची वेळ येते. जास्त पाऊस झाल्यानंतर नदीचा प्रवाह वाढतो. अशा स्थितीत नदी ओलांडणे जीवावर बेतू शकते. पण शिक्षणासाठी विद्यार्थी हा धोका पत्करताना दिसत आहेत.
कारवाफा येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. परंतु नदीच्या अडचणीमुळे पावसाळ्यात आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर येऊ शकते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी स्कूल बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.
साखेरा गावातील विद्यार्थ्यांना कारवाफा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लालमशाह मडावी माध्यमिक विद्यालय व इतर दोन शाळांमध्ये शिकण्यासाठी जावे लागते. साखेरा-कारवाफा दरम्यान वाहणाऱ्या पोटफोडी नदीवर एक छोटा पूल होता. पावसाळ्यात हा पुल पुराच्या पाण्याखाली येत असल्यामुळे चातगाव-पेंढरी मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती. या समस्येतून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोटफोडी नदीवर नवीन पुल बांधण्याच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासन व शासनाकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पोटफोडी नदीवर नवीन पुल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. पावसाळा लागल्याने सध्या या पुलाचे बांधकाम अपूर्ण स्थितीत बंद ठेवण्यात आले आहे. कंत्राटदाराला दिलेली बांधकामाची मुदत भरण्यास आणखी बराच अवधी शिल्लक आहे.
– रविंद्रसिंह चट्टा (उपविभागीय अभियंता)
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #karwafa #schoolstudent)