– आमदार भाई जयंत पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : धानोरा तालुक्यातील कारवाफा येथील ढिवर समाजाच्या साधना संजय जराते यांचेवर कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रीया करतांना डाॅक्टरांनी हलगर्जीपणा केला. त्यानंतर जिल्हा महिला रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करतांना साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.
आरोग्य मंत्री डॉ.तानाजी जाधव यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आमदार भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, ८ डिसेंबरला डॉ. धीरज मडावी आणि त्यांच्या पथकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बेत खालावल्याने साधनावर १० डिसेंबरला शासकीय महिला रूग्णालय,गडचिरोली येथे डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा शस्त्रक्रिया करताना साधना जराते या २३ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यु झाला. व त्यांची १ आणि ४ वर्षाची मुले पोरकी झालीत. असे असतांनाही डॉ. माधुरी किलनाके यांनी नातेवाईकांना जवळपास अडीच तास या बाबतची माहिती दिली नाही. तसेच मृत्यूची घटना उघडकीस येवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दोषी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
डॉ. दावल साळवे यांच्या कार्यकाळात शेकडो बालमृत्यू आणि मातामृत्यू झाल्याची प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेली असून त्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यपध्दी कारणीभूत आहे. साधना संजय जराते हिच्या त्यामुळे ते सुद्धा मृत्यूस कारणीभूत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा महिला रूग्णालयाच्या डॉ. माधुरी किलनाके, शस्त्रक्रीया करणारे डॉ. धीरज मडावी यांना शासनाने तडकाफडकी निलंबीत करून त्यांचेवर हत्येचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि मृतक साधना जराते हिच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.