गडचिरोली : एका जहाल नक्षलीसह जनमिलिशियास अटक

1248

– टीसीओसीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास यश
The गडविश्व
गडचिरोली, ३१ जानेवारी : टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षली व एका जनमिलिशियास अटक केल्याची कारवाई २८ जानेवारी २०२३ रोजी केली.
फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर या दरम्यान ते प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षली व एका जनमिलिशियास अटक केली.
मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी ( ३३) रा. होरादी तह. जि. नारायणपूर (छत्तीसगड) असे जहाल नक्षलीचे नाव असून सन २००५ मध्ये नक्षल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन तो सध्या परालकोट दलममध्ये सीएनएम (चेतना नाट्यकला मंच) कमांडर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये मौजा गारपा जंगल परिसरात पोलीस पार्टीवर अॅम्ब्युश व चकमक तसेच बेरेवाडा जंगल परिसरातील चकमक सन २००९, जाळपोळ, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्हे नोंद आहे. २८ जानेवारी २०२३ रोजी उपविभाग एटापल्ली मधील उपपोस्टे कसनसूर हद्दीतील कसनसूर या गावात आला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस पार्टीने अभियानादरम्यान त्याला ताब्यात घेतले. त्यास २०१९ साली उपपोस्टे कसनसुर येथे दाखल अप.क्र. ०७/२०१९ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सोबतच त्याच्यावर प्राथमिक माहितीनुसार नारायणपूर (छत्तीसगड) येथे गुन्हा दाखल असून अधिकचा तपास नारायणपूर पोलीस यांचे सहकार्याने गडचिरोली पोलीस दल करत आहे.
तसेच चिन्ना मासे झोरे (४०) रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जनमिलिशियाचे नाव असून तो सन २००५ पासुन गट्टा दलममध्ये जनमिलिशिया सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर गर्देवाडा जंगल परिसर ब्लास्टींग व चकमक २०१४ व कुरेंनार (छत्तीसगड) येथील रोड कामावरील वाहन जाळपोळ इ. गुन्हे दाखल आहेत. २८ जानेवारी २०२३ रोजी पोमकें गट्टा (जां.) हद्दीत पोलीस पार्टीने ल टिटोळा ते जांबीया जंगल परिसरात अभियान राबवित असतांना ताब्यात घेण्यात आले. त्यास २०१४ साली पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. १३/२०१४ मौजा गर्देवादा येथे झालेल्या ब्लास्टींग व चकमक या गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे- जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ६२ नक्षलवाद्यांना अटक, ०८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण व ०३ नक्षलवाद्यांचा पोलीस-नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Naxal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here