गडचिरोली : कोपर्शी जंगलात ‘अशी’ उडाली पोलीस नक्षल चकमक, तीन महिला नक्षलीसह ५ नक्षल्यांच्या खात्मा

330

गडचिरोली : तीन महिला नक्षलीसह ५ नक्षल्यांच्या खात्मा
– ३८ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या पोलीस नक्षलक्षकमकीत तीन महिला नक्षलींसह पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. ठार झालेल्या नक्षल्यांची ओळख पटलेली असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य व स्फोटके तसेच ०५ अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलयांवर एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये दोन डीव्हीसीएम (Divisional committee member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलिसांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा नक्षल्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्रामध्ये विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मागील तीन ते चार दिवसांपासून काही नक्षली एकत्र येऊन कट रचन्याच्या तयारीत असून ते गडचिरोली, महाराष्ट्र व नारायणपूर, छत्तीसगड सिमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकुन बसलेले आहेत अशी गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर २०२४ रोजी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या २१ तुकळ्या व सिआरपीएफ क्युएटीच्या ०२ तुकल्या तातडीने कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षल विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या. दरम्यान सदर नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना २१ ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी ०७ : ०० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पोलीसांनी नक्षल्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षल्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०२ पुरुष व ०३ महिला असे एकुण ०५ नक्षली मृत अवस्थेत आढळले असुन सदर मृतक नक्षल्यांची ओळख पटली आहे.

ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये यांचा समावेश

. जया ऊर्फ भुरी पदा, (वय ३१) रा. उलीया, तह. पाखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) कंपनी नं. १० डिव्हीसीएम, हीच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. हिचा चकमक – 31, जाळपोळ – 03, खून – 04, इतर – 11 अशा एकुण – 49 गुन्ह्यात समावेश होता.

2. सावजी ऊर्फ अंकलु दसरु तुलावी, (वय ६५) रा. गुरेकसा, तह. धानोरा, जि. गडचिरोली सप्लाय टिम डिव्हीसीएम, याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. याच्यावर चकमक – ८४, जाळपोळ – ३८, खून – ५४, इतर – ५०, अशा एकुण – २२६ गुन्हे दाखल होते.

३. देवे ऊर्फ रिता, (वय २५ ) , रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) सप्लाय टिम दलम सदस्य, हिच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

४. बसंत, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) सप्लाय टिम दलम सदस्य, ह्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. चकमक – ०५, जाळपोळ – ०१, इतर – ०४, एकुण – १० गुन्हे दाखल होते.

५. सुखमती, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) कंपनी क्र. 10, मृतक डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी याची अंगरक्षक दलम सदस्य, हिच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

वरील ठार झालेल्या नक्षल्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन ०५ अग्निशस्त्र हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस जवान कुमोद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारकामी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.

सदर नक्षल विरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० आणि सिआरपीएफ क्युएटीच्या कमांडोंनी यशस्वीपणे पार पाडले. २०२१ पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८५ कट्टर नक्षल्यांना कंठस्नान, १०९ माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व ३७ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सलग ७२ तास चाललेल्या या खडतर अभियानादरम्यान सी – ६० व क्युएटी जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच सदर भागात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व नक्षल्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #encounter #naxal #bhamragad #koparshi #कोपर्शी_जंगल #koparshi_forest )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here