– कुलकुली ग्रामपंचायत अंतर्गत दारूविक्री बंदीचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : आरमोरी तालुक्यातील कुलकुली ग्रामपंचायत कार्यालयात अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रापं अंतर्गत येणाऱ्या कुलकुली, नवरगाव मक्ता, नवरगाव, रामटोला, पुजारी टोला, चुडियाल येथील दारूविक्रेत्यांनी निर्णयाचे उल्लंघन केल्यास त्यांना राशनसह शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालय कुलकुली अंतर्गत कुलकुली ,नवरगाव मक्ता ,नवरगाव, रामटोला, पुजारी टोला, चुडियाल या सहा गावांमध्ये जवळपास ३५ दारूविक्रेते सक्रिय आहेत. यामुळे संबंधित गावातील महिला, विद्यार्थी व नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या गावांतील अवैध दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथ तालुका चमूतर्फे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच कुलकुली येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्तरीय समिती कुलकुली, महात्मा गांधी तंटामुक्त समिती कुलकुली, गाव संघटन नवरगाव- मक्ता-कुलकुली यांच्या संयुक्त बैठकीमध्ये दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुक्तीपथ तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी बैठकीमध्ये दारूबंदी कायदा, दारूबंदी कशी करावी, दारूबंदीचे फायदे, आरोग्य विषयीची माहिती, व्यसन उपचार शिबिर, विधानसभा निवडणूक सर्व राजकीय पक्षांना व उमेदवारांना दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी आव्हान, ठराव, मतदारांचा जाहीरनामा समजावून दिला. सर्व सदस्यांनी दारू पिणार नाही असा संकल्प केला तसेच संबंधित गावाच्या हद्दीत जो दारूविक्री करणार त्याच्याकडून १५ हजारांचा दंड, दारू पकडून देणाऱ्यास २ हजारांचा बक्षीस, दारू विक्रेत्यांना नोटीस देऊनही सात दिवसाच्या आत त्यांनी अवैध व्यवसाय बंद न केल्यास ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय कागदपत्रे, स्वस्त धान्य दुकानातील धान्य न देण्याचा निर्णय व ठराव घेण्यात आला.
बैठकीमध्ये तंटामुक्त समिती अध्यक्ष रतन कुमरे, ग्रामस्तरीय समिती अध्यक्ष तथा सरपंच विलास बावणे, एस .बी. सहारे ग्रामसेवक कुलकुली, श्रीदास गेडाम पोलिस पाटील कुलकुली, सविता कोवे पोलिस पाटील नवरगाव, विनायक उईके पोलिस पाटील रामटोला, गाव संघटना कुलकुली, नवरगाव मक्ता, लता गेडाम, यामिना गेडाम, समीक्षा दाणे, अनिता गेडाम, योगाजी कोकोडे, अरविंद कोवे, कविता धाकडे, रत्नाकर पेंदाम, इंद्रजीत मडावी, संदीप वरखडे, मुकुंदा उईकें, प्रशांत नाकाडे, हर्षराज भानारकर, भजन मडावी, अक्षय गेडाम, निर्मला गेडाम, कुंदा गेडाम, पौर्णिमा मरस्कोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )