-गडचिरोली जिल्हा पोलीस दल व मैत्री परिवार संस्थेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १७ मार्च : गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ मार्च २०२३ रोजी गडचिरोली येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात आत्मसमर्पण केलेल्या ०८ नक्षलवाद्यांसह दुर्गम अतिदुर्गम भागातील १२७ आदिवासी तरुण-तरुणी या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत. अशी माहिती १७ मार्च रोही पोलीस अधीक्षक कार्यलायत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक निलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी यांनी दिली.
पोलीस दादालोरा खिडकी मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. आदिवासी बांधवांची भयग्रस्त वातावरणातून मुक्तता करणे त्यांनी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न पालीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून केले जातात. सामूहिक विवाह सोहळा देखिल त्याच शृंखलेतील एक उपक्रम आहे. २०१८ सालापासून आम्ही हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असून अहेरी व गडचिरोली येथे झालेल्या या विवाह सोहळ्यात आतापर्यंत १५ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांसह एकुण ४३३ आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले. यंदाचा हा चौथा सामूहिक विवाह सोहळा आहे असे यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलतांना पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले की, पोलीस दादालोरा खिडकी मागील दोन महिण्यांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी काम करते आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विवाह इच्छुक जोडप्यांचा शोध घेण्यात आला व त्यांची यादी तयार करण्यात आली. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी पोलीस विभागावर असते. यावर्षी ०८ आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींचा विवाह लावून देणे ही पोलीस विभागाची मोठी उपलब्धी ठरणार आहे.
सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवार संस्थेच्या नागपूर व गडचिरोली शाखेच्या वतीने केले जाते. यावर्षीचा विवाह सोहळा अधिक शानदार आणि भव्य व्हावा यासाठी पोलीस विभाग व मैत्री परिवार संस्थेचे कार्यकर्ते समर्पित भावनेने कार्य करीत आहेत असेही ते म्हणाले.
आठ आत्मसर्पित नक्षलवादी मुख्य आकर्षण
या सामूहिक विवाह सोहळ्यात एकुण १२७ आदिवासी युवक-युवतींचे विवाह होणार असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या ८ नक्षलवादी जोडप्यांचे विवाह हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
३५०० लोकांची बसण्याची क्षमता असलेला भव्य डोम
या भव्य सोहळ्यासाठी ५०० बाय ८० चौरस फूटाचा भव्य डोम उभारण्यात येत आहे. यात ३५०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या या उपवर-वधूंची १० झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात उपवर वधू आणि त्यांच्या नातेवाईकांची बसण्याची व्यवस्था राहील. आत्मसमर्पित नक्षलवादी उपवर-वधूंसाठी ‘नवजीवन’ हा स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे.
विविध मंडपांना शूरविरांची नावे
विवाहस्थळी चार वेगवेगळ्या आकाराचे मंडप उभारले जात आहेत. प्रत्येक मंडपाला आदिवासी जमातीतील दैवत व शूरविर पुरुषांची नाव देण्यात येणार आहे. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा यांचे नाव तर आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आणि मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नाव देण्यात येणार आहे. वधू-वरांच्या भोजन कक्षाला वीर राणी दुर्गावती यांचे नाव देण्यात येईल.
सामूहिक विवाह सोहळ्याची वैशिष्ट्ये
-आदिवासी परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडेल. -नवदाम्पत्याच्या माता-पित्यांना आहेर भेटवस्तू.
-नवदाम्पत्यासह त्यांच्या ११ नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था.
-वधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि -सांसारिक साहित्य नवदाम्पत्यांशी वर्षभर संपकांत राहून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
-नवविवाहित जोडप्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.