– गट्टा (जां.) हद्दीत उडाली पोलीस नक्षल चकमक
The गडविश्व
गडचिरोली, १ एप्रिल : पोलीस दल आणि नक्षल्यांमध्ये शनिवार १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर पोलीस-नक्षल चकमक उडाली यात २ लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा (३१) रा. तुमरकोडी, पोमकें कोठी, तह. भामरागड जि. गडचिरोली असे ठार झालेल्या नक्षलीचे नाव असून त्याच्यावर आजपर्यंत २ चकमक व २ इतर असे ४ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन – २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लाटुन क्र. ७ मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलिस अधीक्षक @neelotpal_IPS यांच्या मार्गदर्शनात पोलीसांव्दारे राबविण्यात येणा-या नक्षलविरोधी अभियान दरम्याना मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडुन आखली गेली,C 60 पथकाच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले आणि नक्षल्यांची योजना हानून पाडली (1/2) pic.twitter.com/wGDxuynSnH
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) April 1, 2023
तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षल्यांनी नागरीकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे असे नक्षल्यांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातून सिध्द होते. हैराण झालेल्या नागरीकांना आणखी फुस लावून आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतुने तसेच पोलीसांव्दारे राबविण्यात येणाऱ्या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षल्यांकडून आखली जात आहे अशा खात्रीशिर माहिती वरुन गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले असता उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० ते ७० नक्षली जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षल्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षल्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला दरम्यान जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी गोळीबार केला. सुमारे ३० ते ४५ मिनीटे ही चकमक चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला व चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर ०१ पुरुष नक्षल मृतदेह आढळून आले.
हे साहित्य जप्त
घटनास्थळावर ०१ नग देशी बनावटीची रायफल, ०१ नग भरमार रायफल, १ नग ३०३ रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिन व ३० राऊंड्स, ८ एम. एम. रायफलचे ३ राऊंड्स, १२ बोर चे ४ राउंड्स, २ पिट्टु, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, १ सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, १ रेडिओ, रोख रक्कम रुपये ३८,१२०/-, नक्षल कपडे, व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.
सदर जंगल परिसरात सी-६० पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यावेळी दिली.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो. यांनी कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षल्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.
(The Gadvishva) (the gdv) (gadchiroli) (naxal police firing bhamragadh abujhamad)