– जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद, आश्रम शाळेतुन एकुण 300 विद्यार्थ्यांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि.२८ : राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन 2018 पासुन राष्ट्रीय स्तरावर “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” राबविला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता 08 वी व 09 वी मधील विद्यार्थ्यांकरिता आंतरवर्ग, बाह्रवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करुन विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्व शिकविले जात असून समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकाबला करण्यासाठी तयार केले जात आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन इ. नैतिक प्रामाणिकपणा मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वांगीन विकासात भर पडावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक २६ ते ३० डिसेंबर पर्यंत एनसीसीचे धर्तीवर पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व एस.पी.सी चे ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित सर्व कॅटेडचे निरीक्षण केले. गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या या पाच दिवसीय शिबीरामध्ये जवाहर नवोदय विद्यालय घोट, मॉडेल स्कुल अहेरी, शासकिय आश्रमशाळा कसनसूर, पेंढरी, गडचिरोली त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा सिरोंचा, बेळगाव, धानोरा, चामोर्शी व एटापल्ली या शाळांमधील इयत्ता 08 वी व 09 वी मधील प्रत्येकी 30 असे दहा शाळेतील एकुण 300 कॅडेट्स (विद्यार्थी व विद्यार्थींनी) सहभागी झालेले आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलीस दलाकडुन एस.पी.सी. चे लोगो असलेले टी-शर्ट, लोअर व कॅप वाटप करण्यात आले आहे. या शिबीरादरम्यान एस.पी.सी कॅडेट्सना परेड संचलन, पिटी, योगा, टेंट सुशोभीकरण, 100 मीटर तसेच 400 मीटर रिले, गीत गायन, वक्तृत्व, वादविवाद, समुह नृत्य, स्वच्छता अभियान, ट्रॅकिंग, स्पोट्र्स, शस्त्रप्रदर्शनी, मनोरंजनात्मक कार्यक्रम, पथ नाट्यातून सामाजीक समस्या दर्शविणे इ. उपक्रम घेण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटनप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की, महाराष्ट्रात प्रथमत:च गडचिरोली येथे एस.पी.सी अंतर्गत अशा प्रकारच्या निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबीर तुमच्या करीता एक टर्निंग पॉईंट आहे. याद्वारे तुमच्यात शिस्त निर्माण होणार असून विविध स्पर्धेतुन तुम्ही आपल्या कौशल्याद्वारे आकाशाला गवसणी घालण्याकरीता प्रयत्न करा. तसेच या निवासी शिबीरातुन तुम्ही जगण्याचा आनंद लुटायचा आहे व विविध स्पर्धेत भरपूर मेहनत घेऊन यश संपादन करायचे आहे. शेवटी पोलीस अधीक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सहभागी दहा शाळांना एस.पी.सी चे ध्वज प्रदान करण्यात आले.
या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयांवर संबंधीत मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात येणार असून २७ डिसेंबर रोजी सकाळी शारीरिक कवायत व योगा घेण्यात आले. त्यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम या विषयावर जिल्हा समन्वय अधिकारी एसपीसी, जि. गडचिरोली पोउपनि. धनंजय पाटील, ई- सुरक्षा व सायबर सुरक्षा या विषयावर पोउपनि. निलेश वाघ, मुल्ये आणि नितीशास्त्र या विषयावर सपोनि. नितेश गोहणे, महिला आणि मुलींची सुरक्षा या विषयावर सपोनि. रुपाली पाटील व समाजातील वाईट गोष्टीविरुध्द लढा या विषयावर उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. मयुर भुजबळ सा. यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनतर सर्व कॅडेट्स यांना हेलिकॉप्टर पाहणी, पोलीस अधीक्षक कार्यालय व शौर्य स्थळाला भेट देण्यात आली.
सदर कार्यक्रमप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) यतिश देशमुख सा., व अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा., सर्व एस.पी.सी. समन्वयक अधिकारी, अंमलदार व शाळेतील समन्वयक शिक्षक हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार पोउपनि. भारत निकाळजे यांनी मानले.