गडचिरोली : पोलीस-नक्षल चकमक, नक्षल्यांचा तळ नष्ट

2060

– मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम् जंगल परिसरात १५ ऑगस्ट रोजी रात्रौ पोलीस नक्षल चकमक उडाली. यात पोलीस दलाने नक्षल्यांचा तळ नष्ट करत मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले आहे. सदर अभियान गडचिरोली पोलिसांच्या सी- ६० पथकातील २०० जवान व छत्तीसगडच्या डीआरजीच्या ७० कमांडोंनी मिळून राबविले.
१५ ऑगस्ट रोजी छत्तीसगडच्या बिजापूरच्या भोपाळपट्टणम येथील संड्रा परिसरात काही नक्षली असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती त्यानुसार अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २०० सी-६० जवान रवाना केले. बिजापूरचे सहायक अधीक्षक व ७० डीआरजी (जिल्हा रिजर्व गार्ड) कमांडो यांच्या पथकाने संयुक्त अभियान राबविले. दरम्यान यावेळी पोलीस नक्षल चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून मुसळधार पाऊस आणि घनदाट जंगलाचा आधार घेत नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस जवानांनी संपूर्ण परिसराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here