The गडविश्व
गडचिरोली, १० फेब्रुवारी : जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गोडलवाही हद्दीत बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचा वाढत दबाब बघता नक्षली पसार झाले असता घटनस्थळावरून नक्षली साहित्य जप्त केल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारावर अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सा. यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गोडलवाही हद्दीत बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात २० ते २५ नक्षल्यांनी पोलीस जवानांवर जोरदार गोळीबार केला. यावेळी विशेष अभियान पथकांच्या जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला अशी माहिती पोलीस दलाच्या वतीने प्राप्त झाली आहे.
चकमकीदरम्यान सदर जंगल परिसरात, काही नक्षल पिट्टू व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले. सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, शोध मोहीम सुरु आहे अशीही माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Gadchiroli Police) (Police Naxal Firing)