– ३ दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत छत्तीसगड आणि गडचिरोलीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ९ दुचाकी (किंमत 3,15,000/- रुपये) हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कोटगुल पोलीस ठाण्यात २४ मार्च रोजी वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सिसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे (वय १९, रा. टेमली, छ.ग.) याला अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान, त्याने आपल्या साथीदार टेमनलाल रामखिलावन साहू (वय १९, रा. चिलमगोटा, छ.ग.) सोबत मिळून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस तपासादरम्यान गडचिरोली आणि छत्तीसगडमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून ९ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात पो. उपनिरीक्षक कृष्णा सोळंके, पो. उपनिरीक्षक दयानंद शिंदे, पोहवा भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, पोअं विनय सिध्दगु, किशोर बावणे आणि अनिल मडावी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. गडचिरोली पोलिसांची ही धडक कारवाई वाहन चोरांसाठी धडकी भरवणारी ठरली आहे.
