– परिसरात खळबळ , हत्या की कट?
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६१) या महिला अधिकाऱ्याची भरदिवसा घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गडचिरोली जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या नवेगाव (मुरखळा) येथे आज १४ एप्रिल रोजी उघडकीस आली. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच या घटनेने खळबळ उडाली आहे.
दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या घरी रोजची कामवाली महिला पोहोचली असता, कल्पनाताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. घराचे सर्व दरवाजे उघडे होते, टीव्ही सुरू होता. अंगावरील दागिने तसेच बोटातील तीन सोन्याच्या अंगठ्या तसेच असल्यामुळे लुटीच्या उद्देशाने ही हत्या झालेली नसावी, असे स्पष्ट होत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण फेगडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून पुढील तपास करीत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बँक भरती आंदोलनात सहभाग, आणि दुसऱ्याच दिवशी हत्या
कल्पना उंदिरवाडे या नुकत्याच गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती प्रक्रिया संदर्भातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. नोकरभरतीतील अनियमितता, निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ रुजू करून घेण्याची मागणी करत ‘नोकरभरती संघर्ष कृती समिती’च्या दोन दिवसीय धरणे आंदोलनात कालच त्या सक्रीय होत्या.
आज सकाळी त्यांच्या हत्येची घटना समोर येताच, ही हत्या त्या आंदोलनाशी संबंधित आहे का? त्यांच्या मुलाला बँकेत नोकरी मिळवून देण्यासाठी चाललेले प्रयत्न, कौटुंबिक घडामोडी… या सर्व पार्श्वभूमीवर तपासाचा रोख ‘घरातील कोणी जवळचा व्यक्ती’ या दिशेनेही वळतोय.
भरदिवसा घरात घुसून हत्या होणं, हे नक्कीच हादरवून टाकणारं आहे. संपूर्ण प्रकार हा नियोजनबद्ध कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सध्या गडचिरोलीत रंगते आहे. पुढील तपास पोलिस करीत असून तपासाअंती निघणाऱ्या निष्कर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.