– ५०० रुपयाची लाच मागणे पुरवठा निरीक्षकास भोवले
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : थम मशिनवर नाव न आल्याने राशन मिळत नसल्याने तक्रारदार यांना महाफुड साईटवर कागदपत्रे अपलोड करावे लागतात असे सांगून सदर कागदपत्र अपलोड करण्याकरीता ५०० रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून स्वीकारल्याने मुलचेरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक राहुल डोंगरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने २१ मे २०२४ रोजी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस स्टेशन मुलचेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वहीनीचे थम मशिनवर नाव न आल्याने राशन मिळत नव्हते. ८ मे २०२४ रोजी तक्रारदार हे नवीन राशन कार्ड घेवून तहसिल कार्यालय मुलचेरा येथे जावून पुरवठा निरीक्षक राहुल डोंगरे यांना भेटुन वहीनीच्या नावे राशन कार्ड आहे मात्र थम मशीनवर नाव न आल्याने राशन मिळत नसल्याचे सांगितले. पुरवठा निरीक्षक राहुुल डोंगरे यांनी महाफुड साईटवर कागदपत्र अपलोड करावे लागतात त्याकरीता हमीपत्र, उत्पनाचा दाखला, राशन कार्ड झेरॉक्स, चारचाकी वाहन नसल्याचे प्रमाणपत्र व राशन कार्डमध्ये नाव असलेल्या सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स इत्याची कागदपत्रे आणण्यास सांगितले. तक्रारदार यांनी १३ मे २०२४ रोजी पुरवठा निरीक्षक डोंगरे यांना भेटुन कागदपत्रे दिली असा त्यांनी महाफुड साईवर कागपत्रे अपलोड करण्यासाठी ५०० रूपयांच्या लाच रकमेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी आपले पथक व पंच तयार करून सापळा कारवाईचे आयोजन केले. २१ मे २०२४ रोजी केलेल्या सापळा कारवाईत पुरवठा निरीक्षक राहुल डोंगरे यांनी तहसिल कार्यालयातच महाफुड साईटवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५०० रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन मुलचेरा येथे लाचखोर पुरवठा निरीक्षक राहुल डोंगरे याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews # crimenews #acbtrpd #acbmaharashtra)