– आठ लाख रूपयाचे बक्षिस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : नक्षल्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पोहचविण्याची जबाबदारी असलेल्या तसेच चकमक व खूनामधे प्रत्यक्ष सहभाग असलेल्या जहाल महिला नक्षलीने हिंसात्मक वाट सोडून गडचिरोली पोलीस दलासमोर शनिवार २७ जुलै रोजी आत्मसमर्पण केले आहे. रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी ( वय 36 ) रा. बोटनफुंडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलीचे नाव आहे.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७१ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता ही २००६ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली. २००७ पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास तिने सुरुवात केली. २००७ – २००८ मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे तिने प्रशिक्षण घेतले. २००८ – १४ मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. २०१४ मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत ती कार्यरत होती.
दरम्यान २०२० मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच २०१९ मध्ये नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर ०८ लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण ५.५ लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २३ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर महिला नक्षलीची आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया नक्षल्यांवार पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalarrest #naxalsurrender)